ऑनलाईन टीम
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर टीकेची तोफ डांगली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असून शिवसेनेला कुमकवत करत असल्याचा आरोप केला आहे. या स्थितीत मला पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रताप सरनाईक यांच्या या ‘लेटरबॉम्ब’नंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी हे पत्र लिहिल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
प्रताप सरनाईक जेलच्या भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे. सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच,” असे सोमय्या यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आमदार प्रताप सरनाईकांचं या पत्रावरुन मात्र राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे पाहवे लागणार आहे. मराठा आरक्षण तसेच राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसापुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या दरम्यान या दोघां नेत्यामध्ये जवजवळ अर्धा तास खासगी बैठकही झाली होती. यानंतर अनेक चर्चेना देखील उधान आले होते. यामुळे या लेटरबॉम्बवर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.








