प्रतिनिधी / फोंडा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत काल गुरुवारी सायंकाळी गोवा भेटीवर आले असून सोमवारपर्यंत त्यांचा मुक्काम फोंडय़ात राहणार आहे. त्यांची ही अधिकृत भेट नसल्याने कुठलाही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.
आपल्या चार दिवसांच्या मुक्कामात ते संघाशी संबंधीत गोव्यातील काही प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेणार आहेत. सोमवार 1 फेब्रुवारी रोजी सकाळी मातृछायेच्या तळावली येथील बालकल्याण आश्रमाला ते भेट देतील. भागवत यांच्या आगमनामुळे वाहतूक व्यवस्था व सुरक्षेच्यादृष्टीने कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली आहे.









