शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी शाळांतील शिक्षकांनी बांधिलकीच्या नात्याने खासगी शाळांतील शिक्षकांना आपल्या पगारातील काही रक्कम द्यावी, असे आवाहन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी केले आहे.
कोरोना काळातसुद्धा शिक्षकांच्या पगारात कपात करण्यात आलेली नाही. सरकारची आर्थिक स्थिती तुम्हाला माहीत आहे. पदवीधर शिक्षक संघाच्या पदाधिकाऱयांनी आपल्या पगारातील काही रक्कम देण्याचे मान्य केले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक संघाच्या सदस्यांनीसुद्धा याचा गंभीरपणे विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे. जे अशी मदत करतील त्यांचा पगार कोणत्याही कारणास्तव कापला जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
आर्थिकदृष्टय़ा कोलमडलेल्या शाळांना सरकारने अर्थसाहाय्य करावे
कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा शिक्षक संघानेही मदत करण्यास मान्यता दर्शविली आहे. आमच्या सदस्यांना आम्ही निश्चित आवाहन करू, मात्र ज्या शाळा आर्थिकदृष्टय़ा कोलमडल्या आहेत व ज्यांना आपल्या स्टाफचा पगार करणे शक्मय नाही, त्या शाळांना सरकारने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी संघाचे अध्यक्ष मंजुनाथ एच. के. यांनी केली आहे.









