जैन युवा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारी शाळांमध्ये माध्यान्ह आहारांतर्गत विद्यार्थ्यांना शाकाहारी भोजन द्यावे व अंडी आणि तत्सम पदार्थ देवू नयेत, अशा मागणीचे निवेदन जैन युवा संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सरकारी शाळांमध्ये सर्व जाती, धर्माचे विद्यार्थी असतात. त्यामध्ये जैन विद्यार्थीसुध्दा आहेत.
जैन धर्म हा नेहमीच अहिंसेच्या विरोधात आहे. त्यामुळे अंडी किंवा मांसाहार सेवन जैन धर्मामध्ये वर्ज आहे. जैन धर्म आणि लिंगायत धर्मांच्या स्वामींनी सुध्दा माध्यान्ह आहारात बदल करावा, अशी मागणी केली आहे. मुलांच्या भोजनामध्ये दूध, दही, ताक, भाज्या आणि फळे यांचा समावेश करावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे माध्यान्ह आहारामध्ये अंडी देण्याचा सरकारचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी माजी आमदार संजय पाटील, जैन युवा संघटनेचे पदाधिकारी कुंतीनाथ कलमनी, अभय अवलक्की, भरत करेण्णावर, संतोष सातगौडा, संदीप सैबण्णावर, उदय पद्मण्णावर, अजित पद्मण्णावर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.









