तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न
नवी दिल्ली : केंद्र सरकारने चर्चेसाठी पाठविलेल्या नव्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आज शनिवारी आंदोलक शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी बैठक बोलाविली आहे. सरकारशी बोलणी पुन्हा सुरू होऊ शकतात, असे संकेत काही शेतकरी नेत्यांनी दिले आहेत. तोडगा काढण्याची आमचीही इच्छा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
केंद्र सरकारही चर्चा करण्यासाठी उत्सुक असून शेतकऱयांच्या सर्व शंकांवर चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आंदोलक संघटनांच्या नेत्यांना नवे पत्र शुक्रवारी पाठविले असून त्यात सरकारला शेतकऱयांच्या प्रश्नांवर सहानुभूतीपूर्वक विचार करावयाचा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे पत्र पोहचल्यावर शेतकरी नेत्यांनी बैठक बोलाविली आहे.
खासगी बाजारपेठांचा प्रश्न
आमच्या मागण्यांमध्ये किमान आधारभूत किमतीचा समावेश आहे. त्यावर आम्ही तडजोड करणार नाही. नव्या कृषी कायद्यांमध्ये खासगी बाजारपेठांचा उल्लेख आहे. पण या बाजारपेठांमध्ये आम्हाला किमान आधारभूत किंमत मिळेल याची शाश्वती कोण देणार असा प्रश्न काही शेतकरी नेत्यांनी विचारला आहे. या विषयावर आम्ही सरकारशी चर्चा करण्यास तयार आहोत असेही संकेत शेतकरी नेत्यांकडून मिळत आहेत.
चर्चा झाल्यास तोडगाही निघण्याची शक्यता आहे.









