मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी / पणजी
भाजप आमदाराचा वाढदिवस, भाजप स्थापना दिन, हुनर हाट प्रदर्शन, आदींद्वारे सरकारने जाणीवपूर्वक लोकांना कोरोनाच्या विळख्यात ढकलले आहे. त्यामुळे लोकांना दंड देण्यापूर्वी पोलीस महासंचालकांनी मांद्रे येथील वाढदिवस कार्यक्रमात सहभागी झालेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे पदाधिकारी आणि 144 कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हुनर हाट कार्यक्रमाचे आयोजक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकांना दंड देऊन पैसे गोळा करण्याची वेळ यावी यावरून सरकार कशाप्रकारे दिवाळखोरीत गेले आहे, त्याचा पुरावा मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील, दिशाहीन व बेजबाबदार सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्याची तिजोरी रिती झाली आहे, आणि आता ती भरण्यासाठी भरमसाठ दंडाद्वारे लोकांना लुटण्याचा डाव आखत आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली.
शिमगोत्सव, इस्टर, शब ए बारात यासारखे पारंपरिक सण, उत्सव असताना 144 कलम लागू करून सरकारने बहुजन आणि अल्पसंख्यांकाना उत्सवात सहभागी होण्यापासून वंचित केले. खरे तर या काळात कोरोनाचा प्रभावही कमी होता. परंतु आता जेव्हा कोविड रुग्णांमध्ये वाढ होत आहे, तेव्हा 144 कलम मागे घेतले, यामागे सरकारचा हेतू तरी काय? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
दरम्यान, नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यास चोडणकर यांनी जोरदार हरकत घेतली. चांगले रस्ते, साधनसुविधा लोकांना मिळत नाही, तोपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, आणि आम्ही ती करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
हे सरकार प्रत्येक टप्प्यावर अपयशी ठरले आहे. केवळ भांडवलदारांना गोवा विकण्यात ते यशस्वी ठरले आहे, अशी टीकाही चोडणकर यांनी केली. पत्रकार परिषदेस त्यांच्या सोबत तुलीयो डिसोझा व एनएसयुआय नेते नौशाद उपस्थित होते.









