ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोविड-19 आजाराच्या चाचण्या वाढवण्यासाठी सरकारने COBAS 6800 हे मशीन मागविले आहे. या अत्याधुनिक मशिनद्वारे 24 तासात 1200 टेस्ट करता येणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हे मशीन नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलकडे सुपूर्द केले आहे.
कोविड-19 च्या फास्ट चाचण्या करणारे हे भारतातील पहिले मशीन आहे. हे मशीन रोबोटिक्सने परिपूर्ण असल्याने डॉक्टरांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका नाही. या मशीनला टेस्टिंगसाठी न्यूनतम BSL2 आणि नियंत्रण लेव्हलच्या लॅबची आवश्यकता असते. या मशीनमध्ये पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लॅमायडिया, हेपेटाइटिस बी अँड सी, एचआयव्ही, एमटीबी यासारख्या आजारांची टेस्ट करता येते.
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कोरोना टेस्ट वाढविण्यावर भर दिला जात आहे. देशात दररोज अंदाजे 1 लाख सॅम्पलची टेस्ट करण्यात येत आहे. तर आतापर्यंत 20 लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 81 हजार 970 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2649 जणांचा मृत्यू झाला आहे.









