पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांचे कौतुक
प्रतिनिधी/ पणजी
‘स्वयंपूर्ण गोवा’ आणि ‘सरकार तुमच्या दारी’ हे दोन्ही उपक्रम म्हणजे गोवा सरकारच्या लोकाभिमुख सुशासनाचे प्रतिबिंब आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक केले. राज्य सरकारने प्रत्येक घटकासाठी 100 टक्के कल्याणकारी योजना राबविल्या असून राज्यात विकसित होणाऱया पायाभूत सुविधांमुळे शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमारांसह सर्व घटकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेंतर्गत शनिवारी राज्यातील स्वयंपूर्ण मित्रासह नगराध्यक्ष, सरपंच, पंचसदस्य तसेच अन्य जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना पंतप्रधान बोलत होते. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव परिमल राय आदींची उपस्थिती होती.
सुमारे दीड तास चालला कार्यक्रम
राज्यातील 198 पंचायती व 14 पालिकांमधून पंतप्रधानांच्या या संवादाचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम पाहण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. सुमारे दीड तास हा कार्यक्रम चालला.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा गौरव
पुढे बोलताना पंतप्रधानांनी आपले मित्र स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी गोव्याला प्रगतीपथावर नेले असल्याचे नमूद करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांचे हे कार्य विद्यमान मुख्यमंत्री तेवढय़ाच प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत, असे सांगितले. यंदा गोव्यात ग्रामीण पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट जादा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गोव्याने गरीब आणि गरजूंना मोफत रेशन देण्याचे 100 टक्के लक्ष्य गाठले आहे. राज्यात कोरोना लसीच्या प्रथम डोसाचे उद्दिष्ट यापूर्वीच पूर्ण झाले आहे. खुल्या शौचमुक्तीचे उद्दिष्ट गाठले आहे. त्याशिवाय प्रत्येक घराला विजेशी जोडण्याचे लक्ष्यही साध्य केले. हर घर जल मिशनअंतर्गत कामगिरी करणारे गोवा हे पहिले राज्य बनले आहे. महिलांची सुरक्षितता आणि सन्मानासाठी गोवा सरकार अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवत आहे. शौचालये, उज्ज्वला गॅस कनेक्शन ंवा जन धन बँक खाती असो, महिलांना या सुविधा पुरवण्याचे मोठे काम गोव्याने केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
लाभार्थ्यांना दारात सेवा ः ईशा सावंत
स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम करणाऱया राज्याच्या अवर सचिव ईशा सावंत यांनी आपले अनुभव सांगताना लाभार्थ्यांना त्यांच्या दारात सेवा आणि उपाय मिळत असल्याची माहिती दिली. एकत्रित पद्धतीने डेटा संकलित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे आवश्यक सुविधांचे मॅपिंग करणे शक्मय झाले, असे त्या म्हणाल्या. महिला सक्षमीकरण, बचत गट यंत्रणेमार्फत महिलांना सोशल मीडिया मार्केटिंग आणि ब्रँडिंग उपकरणे व साहाय्य पुरविणे, अटल इन्क्मयुबेशन गटाचीही मदत घेण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भरतेचे ध्येय साध्य ः मिरांडा
माजी मुख्याध्यापक व सरपंच कॉन्स्टांसिओ मिरांडा यांनी बोलताना, स्वयंपूर्ण मोहिमेमुळे विविध क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे ध्येय साध्य करण्यासाठी नवीन उपक्रमांना मदत झाली, असे त्यांनी सांगितले. प्रदीर्घ काळ प्रलंबित कामे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
स्वनिधी योजना लोकप्रिय ः फळारी
कुंदन फळारी यांच्याशीही पंतप्रधान बोलले, आपण आणि स्थानिक प्रशासन समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वनिधी योजना लोकप्रिय करण्याबाबतचा अनुभवही त्यांनी कथन केला.
कार्दोज यांच्याकडून मच्छीमारसंबंधी योजनांबद्दल माहिती
मत्स्यव्यावसायिक लुईस कार्दोज यांनी सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यातील फायदे आणि इन्सुलेटेड वाहने वापरण्याबाबत अनुभव सांगितला. किसान पेडिट कार्ड, नाविक ऍप, बोटींसाठी वित्तपुरवठा, मच्छीमार समुदायाला मदत करणाऱया योजनांबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली.
दिव्यांग जनांसाठी केलेल्या उपाययोजनांची जाणून घेतली माहिती
रुकी राजसाब यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनी स्वयंपूर्ण अंतर्गत दिव्यांग जनांसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बचत गटाच्या प्रमुख निशिता नामदेव गवस यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडून त्यांनी गटाची उत्पादने आणि त्यांच्या विक्री पद्धतीबाबत माहिती जाणून घेतली. महिलांचा सन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सरकार उज्ज्वला, स्वच्छ भारत, पंतप्रधान आवास, जन धन यासारख्या योजना हाती घेत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
दुग्ध उपक्रमांबाबत चर्चा
गोवा डेअरीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांच्यासोबत पंतप्रधानांनी त्यांच्या समुहाच्या दुग्ध उपक्रमांबाबत चर्चा केली. त्यावेळी किसान पेडिट कार्ड योजना लोकप्रिय करण्यासाठी शिरोडकर यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
स्वयंपूर्ण चळवळ अंमलबजावणीसंबंधी मुख्यमंत्र्यांकडून माहिती
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील स्वयंपूर्ण चळवळीची उद्दिष्टे आणि त्यांच्या अंमलबजावणीची रचना याबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. लोकांना तत्पर आणि प्रभावी सेवा देण्यासाठी तसेच सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा आदर्श उपक्रम ठरला आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांचे भाजपकडून आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यातील स्वयंपूर्ण मित्र, सरपंच, पंच आणि विविध योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी आज गोमंतकीय नागरिकांसाठी तब्बल दीड तास दिला. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे.
भाषणाची सुरुवात कोकणीतून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतून केली. ’आत्मनिर्भर भारताचें सपन, स्वयंपूर्ण गोवा येवजणेंतल्यान साकार करपी गोंयकारांक येवकार. तुमचे सारख्या धडपडपी लोकांक लागूनच गोंय राज्याच्यो गरजो गोंयांतूच पुराय जावपाक सुरवात जाल्यात ही खोसयेची गजाल आसा’, असे ते म्हणाले









