विकतचा टँकर किंवा हंडा घेऊन गाठावी लागतेय विहीर
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात नव्याने हद्दीत आलेल्या समाधीचा माळ हा परिसर समाविष्ट झाला आहे. या परिसराला पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येत येतो. मात्र या पाणी पुरवठय़ाचे नेहमीच तीन तेरा वाजलेले असतात. पाण्याच्या पाईपलाईन आहेत परंतु पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरली जात नसल्याने दररोज पाण्याची टंचाई ही नित्याची समस्या या भागात असते. त्याकरिता येथील नागरिकांना दररोज सकाळपासून नजिकच्या विहिरी, कोणाच्या बोअरवेलवर डोक्यांवर हंडे घेऊन किंवा विकतचा टँकर मागवावा लागतो. पाण्यासाठी वणवण थांबवा, अशी आर्त हाक त्यांनी सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे मांडली. उद्या प्राधिकरणाच्या अधिकाऱयांसोबत बैठक घेण्यात येणार असून महिला आपली समस्या त्यांच्याकडे मांडणार आहेत.
सध्या शहराचाच भाग असलेल्या भैरोबाच्या पायथ्याच्या समाधी माळ परिसराचा भाग हा पूर्वी दरे ग्रामपंचायतीत मोडत होता. या भागात पाण्यासाठी संगममाहुली येथील कृष्णा नदीच्या पाणी उपसा केंद्राचे पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पुरवण्यात येते. परंतु हे पाणी पुरवठा होताना पाईप लाईनमधून आले म्हणजे कमी वेळ नाही म्हणजे पाच पाच दिवस पाणीच येत नाही, अशी पाणी पुरवठय़ाची अवस्था आहे. पाईपलाईन असूनही पूर्ण क्षमतेने पाणी नसल्याने नागरिकांना दर आठवडय़ाला खासगी टँकर पाचशे रुपये देवून बोलवावा लागतो. टँकर मालकांचे या भागात नेहमी फोन असतात. लाईट गेली कुठे बिघाड झाला की लगेच पाण्याची समस्या भेडसावते अन् पाण्यासाठी फोन टँकरवाल्याला केला जातो. पाण्यासाठी नागरिक या परिसरातील कोणाच्या विहिरीवर, कोणाच्या बोअरवर पाणी आणण्यासाठी जातात. विशेष म्हणजे सातारा शहराच्या जवळ असलेल्या भागात गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची गंभीर समस्या आहे.
उपाध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे मांडली कैफियत
पाण्याची टंचाई झाल्याने समाधीचा माळ येथील नागरिकांनी लेखी निवेदन देवून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जलस्वराज्य टप्पा क्रमांक 2 मधील योजनेमधून ही योजना आहे. गेली तीन वर्ष पूर्ण झालेली आहे. तेव्हापासून ग्रामस्थांना आठवडय़ातून एकदाच होतो. वारंवार तक्रार करुनही कर्मचाऱयांकडून उडवाउडवीची उत्तरे देतात. पाण्याची सोय करण्यात यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला आहे. त्यावर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पाण्याच्या समस्येबाबत उद्या प्राधिकरणाच्या अधिकाऱयांच्यासोबत बैठक घेतो अन् नेमकी काय अडचण आहे ते तुम्ही सांगा मग त्यावर उपाययोजना करता येतील, असे त्यांनी आश्वासन दिले.








