सकाळीच फोन वाजला. हॅलो, मॅडम मी शालिनी. थोडं बोलायचं होते आपल्याजवळ.. नमस्कार.. बोला. माझी एक समस्या आहे. नेमकं काय करावं सुचत नाही म्हणून फोन केला. हं.. बोला.
‘मॅडम, सुदैवाने माझी आर्थिक स्थिती, तब्बेत सारे काही उत्तम आहे. देवाने सारे भरभरून दिले आहे. परंतु तरीही एक खंत आहे. माझा मुलगा आणि सून दोन्हीही उच्चपदस्थ आहेत. तशी घरात काही भांडणे वगैरे नाहीत. परंतु कुठे थांबायचं हे बहुदा कळत नसावं त्यांना. येण्याजाण्याच्या अनिश्चित वेळा, नुसती दगदग, धावपळ.. जेवणाच्या वेळा धड नाहीत. स्वतःच्या आरोग्याकडे नीट लक्ष नाही, शांत बसून आमच्याजवळ कधी गप्पा मारल्या, चौकशी केली, भरभरून बोललं असं कधीच नाही. आमचे एक जाऊ दे परंतु मुलांकडे नीट लक्ष नाही, त्यांच्यासाठीही वेळ देणं नाही, कुठल्या सणात सहभाग नाही. 3-3 फ्लॅट आहेत. आता नवीन घराच्या विचारात आहेत. घरं, जमिनी आणि नवनवीन गाडय़ांचा शौक.. संपन्नता आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु कुठे थांबायचे हे कळत नसेल तर काय करायचं?
यांच्याकडे अमुक गोष्ट आहे ती आपल्याकडे नाही. ती मिळाली तर आपण अधिक सुखी होऊ. असं यांना वेगवेगळय़ा बाबतीत वाटत असते. कुठेना कुठे पैशासंदर्भात, प्रॉपर्टी संदर्भात सतत तुलना! प्रॉपर्टी.. प्रॉपर्टीसाठी किती धावायचं? त्यांचं हे ऊर फुटेस्तो धावणं पाहूनच कसंतरी होतं. दोन वर्षांपूर्वी सुनेची आई अचानक गेली आणि ती थोडी ताळय़ावर आली होती. आईच्या नसण्याची आणि तिला वेळ न देण्याची सल कुठेतरी जाणवत होती. परंतु नंतर परत सारे चित्र आहे तसेच झाले.
मी मध्यंतरी एकदा बोलून पाहिलं त्यांच्याजवळ. पण काहीही उपयोग नाही. कधी वाटतं यांची सुखाची नेमकी व्याख्या तरी काय? यांच्या इच्छा हव्यासात बदलल्या आहेत का? हे हवं ते हवं.. सगळं हवं खरं. पण आहे त्याचा उपभोग घ्यायलाच वेळ नसेल तर काय उपयोग या साऱयाचा. माणसं, नाती, जीवनातले छोटेछोटे आनंदाचे क्षण अनुभवताच येत नसतील तर सारं असूनही उपयोग शून्यच की.. पैसा असून ‘आनंद’ कमीच आणि ‘हवं’च्या हव्यासात ‘असमाधान’च अधिक. जर ‘समाधान’ नसेल तर हे धावणं थांबायचं तरी कधी? यांना अपेक्षित सुख म्हणजे नेमकं काय हे समजतच नाही हो. यांना समजाऊन सांगायचं तरी कसं हेही कळत नाही.’ शालिनीकाकू अगदी पोटतिडकीने बोलत होत्या. वरील उदाहरणातील जोडप्यासारखी वेगवेगळय़ा बाबतीत असंतुष्ट असलेली अनेक माणसे पहायला मिळतात. सततची तुलना आणि हव्यास असलेल्या माणसांना ‘अजून हवं’ च्या हव्यासात असलेले सुखही उपभोगता येत नाही. एखादी गोष्ट मिळावी ही इच्छा असणे, त्यासाठी प्रयत्न करणे यात वावगे काहीच नाही परंतु इच्छा आणि लालसा यातील अस्षष्ट सीमारेषेचे भान असणे आवश्यक आहे. कारण ‘आणखी हवं’ चा नेहमी गुणाकारच होत जातो. त्या हवं असण्याला शेवट नसतोच. असे म्हटले जाते की मानव हा महत्त्वाकांक्षी आहे. महत्त्वाकांक्षा, इच्छा, अपेक्षा असणे यामध्ये काही गैर नाही परंतु अनेकदा तुलनेमुळे आणि लालसेमुळे मन अस्वस्थ होते. कधी कधी अगदी सुरळीत आणि काहीसे एकसुरी असे आपले आयुष्य चाललेले असते. परंतु सगळे काही ठीक चाललेले असते म्हणूनच की काय असे आयुष्य मिळण्यात आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव आपल्याला रहात नाही किंवा जाणीव बोथट होते म्हणा. आपली अशी माणसे असणे, त्यांच्याबरोबर गप्पा मारणे, सर्वांसोबत हसत खेळत एखादा दिवस घालवणे या सगळय़ातले सुख आपण इतके गृहीत धरून चालतो की त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटले पाहिजे याचाच विसर पडतो. अचानक कधीतरी त्यातली एखादी व्यक्ती, गोष्ट नाहीशी होते आणि नंतर त्या ‘असण्यातले सुख’ प्रकर्षाने जाणवते. म्हणून आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची जाणीवपूर्वक एक यादी केली पाहिजे. त्यामधे अगदी माणसे, नाती यापासून आपली कौशल्ये, वस्तू, शारीरिक मानसिक आरोग्यापर्यंत अनेक गोष्टी येऊ शकतात. ज्याविषयी आपण कृतज्ञ असणे आपल्यालाच सकारात्मकतेच्या दिशेने नेण्यास मदत करेल. मात्र या असण्याविषयी कृतज्ञ न राहता जर तुलना करत राहिले तर असंतुष्टतेमुळे इच्छा हव्यासात बदलू लागतील आणि सतत ‘हवं’ चा ध्यास आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत संपणार नाही. सततची तुलना आणि हव्यासामुळे आहे त्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. अनेकदा आनंदाचे क्षण आपल्या जवळपास असूनही अशा मनोवृत्तीमुळे आहे त्याचा विसर पडतो आणि आपली अवस्था स्वतःजवळच असलेल्या कस्तुरीच्या शोधात धावणाऱया कस्तुरीमृगासारखी होते.
याबाबत वाचनात आलेल्या एका कथेचा उल्लेख इथे आवर्जून करावासा वाटतो. स्व. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या एका कथेमध्ये अशा मानसिकतेचे चित्रण आहे. ती कथा अशी आहे.. एक भ्रमिष्ट मनुष्य परिसाच्या शोधात भटकत होता. धुळीने माखलेल्या त्याच्या केसांच्या बटांचा गुंता झाला होता. शरीर नुसते सापळय़ासारखे झाले होते. परिसाच्या शोधात त्याची ही अवस्था झाली होती. शोध…शोध आणि अखंड शोध.. हेच त्याचे आयुष्य झाले होते. समुद्र जसा कधीही आकाशापर्यंत पोहचू शकणार नसतो तरीही त्याच्याकडे हात उंचावून झेपा टाकत राहतो. तारे जसे कधीच पोहचू शकणार नसतात अशा ध्येयामागे अखंड गोल गोल भ्रमण करत राहतात. तसा त्या एकाकी किनाऱयावर, पिंजारलेल्या केसांच्या बटा घेऊन तो भ्रमिष्ट माणूस परिसाच्या शोधात हिंडत होता. एक दिवस एक खेडवळ मुलगा त्याच्या जवळ आला आणि त्याने विचारले, ‘अहो, तुमच्या कमरेभोवती बांधलेली ही सोन्याची जी साखळी आहे ती तुम्हाला कुठे मिळाली?’ तो दचकलाच त्याने बघितले तर कमरेभोवती बांधलेली लोखंडाची साखळी सोन्याची झाली होती. हे स्वप्न नव्हते, सत्य होते. पण ती लोखंडाची साखळी सोन्याची केव्हा झाली हे त्याला कळलेच नव्हते. खाली बघत चालत रहायचे, प्रत्येक दगड उचलून लोखंडाच्या साखळीला लावून पहायचा, फेकून द्यायचा असे अविश्रांतपणे सुरू असताना ‘परिस’ केव्हातरी सापडला होता, साखळी सोन्याची झाली होती. पण त्या साखळीकडे न पाहताच त्याने तो फेकूनही दिला होता. परिस सापडला आणि हरवलाही. त्याने कपाळ बडवले. त्याला केव्हा यश मिळाले होते ते त्याला समजलेच नव्हते. आता मात्र उन्मळून पडलेल्या वृक्षासारखे त्याचे हृदय विदीर्ण होऊन धुळीला मिळाले होते.
खरोखरच ही कथा बोध घेण्यासारखी आहे. केवळ सुखाचा शोध घेत भौतिक समृद्धीमागे आपण आंधळय़ासारखे पळत राहिलो तर या कथेतील मनुष्यासारखी आपल्या आयुष्याची शोकांतिका होऊ शकते. जे आयुष्य आपल्याला मिळाले आहे त्याचे सोने आपणच करू शकतो. तुलना, हव्यास या गोष्टी बाजूला करत ‘समाधान रूपी परिस’ आपल्याला गवसला आणि असलेल्या गोष्टींबाबत आपण कृतज्ञ राहिलो तर आयुष्याचे सोने होईल हे मात्र निश्चित!
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583








