प्रतिनिधी/ पणजी
आपल्या हिंदू धर्म प्राचीन धर्म आहे. सनातन वैदिक धर्मामध्ये अग्नीची महानता सांगितलेली आहे. आपल्या घराला तेव्हाच गृहस्थाश्रमाचे स्वरुप प्राप्त होणार ज्यावेळी तिथे अग्नीची स्थापना केली जाते. अग्नीची स्थापना जर झाली असेल तर मनुष्य त्याठिकाणी राहू शकतो. देवघरामध्ये प्रतिदिन दीपप्रज्वलित करणे हीच आपली संस्कृती आहे. ज्या गृहस्थाश्रमामध्ये देवघरात दीप प्रज्वलीत केलेला असतो ते घर अग्नीचे घर, देवाचे घर मानले जाते. अशा घरातील सर्वांना देवाच्या सान्नध्यात राहण्याचे सौभाग्य प्राप्त होते. जर घरामध्ये या दीपाची पूजा करणारे जर नसेल तर देवाला कसं वाटेल ? भले उशीर झालेला असेल, पण आजपासून हिंदुंच्या प्रत्येक
घरामध्ये दीपाची पूजा होणार,देव पूजा होणार. यासाठीच ऑनलाइन पुरोहित प्रशिक्षण प्रारंभ झाले आहे. संपूर्ण हिंदू समाजाने याचा आस्वाद घ्यावा. आपल्या वैदिक संस्कृतीने दिलेले शिक्षण ग्रहण करा, समाजाने पुरोहितांचा जरूर विचार करावा. ज्ञानपिपासू होऊन ही विद्या आत्मसात करा. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, सच्चदानंदाची प्राप्ती होणार आणि गृहस्थाश्रम सफल होणार असे संबोधन सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींनी केले.
श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी – गोवा धर्मसेवेच्या माध्यमातून प्रारंभ झालेल्या ऑनलाइन पुरोहित वर्गाच्या उद्घाटन सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींच्या पावन करकमलाद्वारे नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर समंत्रक सोत्साहपूर्वक संपन्न झाले. याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते.
तंत्रज्ञातील तज्ञ व टेक्नॉलॉजीचे प्रमुख फोंडु अश्वेकर यांच्या मार्गदर्शनाने ही ऑनलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. या ऑनलाइन सेवेअंतर्गत प्रथम वर्गाला शिक्षक म्हणून वेदाचार्य सिद्धेशजी यांनी प्रारंभ केला व त्यांना तांत्रिक सहाय्य ज्ञानदेव कालापूरकर यांनी केले तसेच श्री दिपक गावस, सामाजिक विभाग प्रमुख व सदानंद केदार यांच्या नेतृत्वाखाली हे वर्ग सुसम्पन्न होत आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्ञानार्जन तसेच पुण्यार्जन करण्याची सुसंधी सर्वांना प्राप्त होत आहे. पूज्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने सुरु झालेल्या या उपक्रमाची गोव्यात तर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष दखल देखील घेण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आपले संदेश पाठविले आहेत. जनता जनार्दनाने पुण्यार्जन करुन समाजात शांती तथा एकता निर्माण व्हावी हा ह्या मागचा मुख्य उद्देश आहे. अशा या ऑनलाइन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गोमंतकीयांना श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे करण्यात येत आहे.









