उत्तरप्रदेशात भाजपकडून राजकीय प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी आयाराम आणि गयारामचा खेळ सुरू झाला आहे. राज्यातील नेत्यांकडून पक्षांतराचे सत्र सुरू असताना भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात चढाओढ निर्माण झाली आहे. सप अध्यक्ष अखिलेश यावद यांनी काही दिवसांपूर्वी सीतापूर येथील भाजप आमदार राकेश राठौड यांना स्वतःच्या पक्षात सामील करून घेतले होते. तर आता भाजपने सप आमदार सुभाष पासी यांना प्रवेश दिला आहे.
गाजीपूरच्या सैदपूर विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार राहिलेले सुभाष पासी यांनी मंगळवारी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. तत्पूर्वी पासी यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
भाजपची तत्वे, मुख्यंत्री योगींचे काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने प्रभावित होत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. योगींच्या शासनकाळात राज्यात गुन्हय़ांना आळा बसला असून कायदा-सुव्यवस्था सुधारली असल्याचा दावा पासी यांनी केला आहे.
दलित समाजाशी संबंधित असून समाजासाठी काम करण्याच्या उद्देशानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमच्या क्षेत्रातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभाव असून तेथे भाजपला विजय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे पासी यांनी म्हटले आहे.
तर भाजपमध्ये सामील झालेल्या पासी यांची समाजवादी पक्षाने हकालपट्टी केली आहे. पासी यांच्यासोबतच शेखर दुबे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच बसपच्या अनेक नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.









