एखादा चविष्ट पदार्थ पाहताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. तोंडाला सुटणारे हे पाणी आपल्याला स्वादापासून पुढल्या अनेक गोष्टींची माहिती देते. तोंडात तयार होणारे हे पाणी म्हणजे लाळ फारच महत्त्वाची असते. म्हणूनच लाळ बनण्याच्या प्रक्रियेत काही अडथळे येत असतील तर ही एक गंभीर समस्या आहे. कमी प्रमाणात लाळ बनण्याच्या समस्येला वैद्यकीय भाषेत हायपोसलायव्हेशन म्हणतात.
घरगुती उपचार
काही किरकोळ उपचार करुन देखील तोंडाला कोरड पडण्याच्या या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. या उपायांमुळे लाळेची निर्मिती होण्यास मदत होईल. यासाठी कमी साखर असणारे च्युइंगम चघळा. नाकाने श्वासोच्छवास घेण्याचा प्रयत्न करा. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा हळद टाकून गुळण्या करा. सेलेरी स्टिक चघळा यामुळे तोंड कोरडे पडण्याची समस्या कमी होईल.
एक लिंबू कापून चाटा.
- आपल्या लाळ ग्रंथी पुरेशा प्रमाणात लाळ निर्माण करू शकत नाहीत तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. यामुळे तोंड कोरडे पडते तसेच अन्न चावणे, गिळणे, चव ओळखणे, बोलणे अशा क्रिया करताना त्रास होतो.
- दातांची झीज होण्याबरोबरच तोंडात अनेक प्रकारची संक्रमणे होण्याची शक्यता वाढते.
- तोंड कोरडे पडले की आपल्याला वाटते तहान लागली म्हणून आपण भरपूर पाणी पितो. त्यामुळे सतत होणार्या युरीनेशनला देखील आपण समस्या समजून घाबरून जातो. लाळेमुळे निर्माण होणार्या समस्या या कधी सामान्य तर कधी गंभीर स्वरूपाच्या देखील असू शकतात.
कारणे काय?
- लाळ ग्रंथीमध्ये संक्रमण झाले असल्यास लाळेच्या प्रमाणात कमतरता येऊ शकते. मम्प्स किंवा इतर विषाणुंचे संक्रमण देखील याला कारणीभुत ठरू शकते.
- एखाद्या स्वयंप्रतिरोधक सिंड्रोममुळे देखील लाळग्रंथींवर परिणाम होऊ शकतो. संशोधनानुसार र्हुमेटॉयड आर्थरायटिसने त्रस्त असणार्या त्रियांना नेहमी हा त्रास होऊ शकतो.
- लाळ ग्रंथीमध्ये खडे झाल्याने देखील ही समस्या उद्भवू शकते. यामुळे अनेकदा सूज येते आणि लाळ निर्माण होण्यात अडचणी येतात.
- अनेकदा विशिष्ट प्रकारची औषधे घेतल्याने देखील तोंड कोरडे पडते. तर काही गंभीर आजार किंवा लाळ ग्रंथीमध्ये सूज आल्याने देखील अशी समस्या निर्माण होऊ शकते.
औषधोपचार
- लाळ बनण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यास शरीराच्या कार्यप्रणालीवर देखील याचा वाईट परिणाम होतो. अशात वारंवार किंवा फार काळासाठी हा त्रास होत असेल तर औषधोपचार करणे गरजेचे आहे.
- डॉक्टरांकडून लक्षणांची तपासणी करुन त्यानुसार औषधे दिली जातात. बरेचदा सामान्य औषधोपाचारांनीच आराम मिळतो. तर काही वेळा दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. औषधांच्या मदतीने लाळेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
– डॉ. प्राजक्ता पाटील









