परिसरातील रहिवाशांचे महापालिका आयुक्त-आमदारांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
समर्थनगर परिसरातील विविध समस्यांचे निवारण करण्यात आले आहे. तसेच येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र पाचवा क्रॉस परिसरातील रस्त्याचे काम अर्धवट असून डेनेजवाहिन्या घालण्यात आल्या नाहीत, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. डेनेजवाहिन्या घालून रस्त्याचा विकास करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन समर्थनगर परिसरातील रहिवाशांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. व आमदार अनिल बेनके यांना दिले. समर्थनगर वसाहतीमधील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली होती. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर येथील समस्यांचे निवारण करण्यात आले आहे. तसेच काही रस्त्यांचे डांबरीकरण आणि काही ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात आला नाही. त्यामुळे पावसाळय़ात रहिवाशांची गैरसोय होत आहे. तसेच परिसरात डेनेजवाहिन्या नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. या ठिकाणी डेनेजवाहिन्या घालण्याची गरज आहे. तसेच अर्धवट रस्त्यांचा विकास करण्यासाठी मनपाला यापूर्वी देखील निवेदन देण्यात आले होते. पण याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. आणि आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन रस्त्याचा विकास करण्याची मागणी केली. सदर रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची विनंती करण्यात आली. विकासकामे राबविण्यासाठी निधी उपलब्ध नाही. पण उपलब्ध निधीमधून समस्यांचे निवारण करावे, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी मनपा अधिकाऱयांना केली. याप्रसंगी समर्थनगर परिसरातील रहिवासी उपस्थित होते.