प्रतिनिधी / बेंगळूर
विधानपरिषदचे सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांच्या विरोधात सभागृहात मंगळवारी अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. भाजपचे विधानपरिषद सदस्य आयनूर मंजुनाथ यांनी सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडला. त्यावर भाजप व निजदच्या सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे या ठरावावर चर्चा केल्यानंतर मतदान घेण्यात येईल. मात्र सभापतींनी यावर चर्चेसाठी अद्याप वेळ निश्चित केलेली नाही.
15 डिसेंबर रोजी सभापती प्रतापचंद्र शेट्टी यांच्याविरोधात भाजपने अविश्वास ठराव मांडण्याची तयारी केली होती. परंतु यावेळी सभागृहात प्रचंड गदारोळ माजला होता. त्यामुळे या अधिवेशनात निजदचा पाठिंबा घेऊन भाजपने सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. अधिवेशन आणखी तीन दिवस चालणार असून या कालावधीत अविश्वास ठरावावर सभागृहात चर्चा होईल का, याविषयी स्पष्टपणे सांगता येणार नाही.









