कोरोना काळातही प्रामाणिकपणे काम : केवळ तीन हजार रुपये मानधन
सावंतवाडी:
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱया सफाई कामगारांना अल्प मानधन मिळत आहे. ‘कोरोना’ संसर्गकाळातही हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा करता डय़ुटी बजावत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने या कर्मचाऱयांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी सफाई कर्मचाऱयांनी केली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात काही महिन्यापूर्वी कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी भरण्यात आले. या कर्मचाऱयांना मासिक तीन हजार मानधन देण्यात येत आहे. मानधनात काही महिन्यानंतर वाढ होईल, या आशेवर कर्मचारी प्रामाणिक काम करत आहेत. त्याच कालावधीत कोरोना संसर्ग सुरू झाल्याने सफाई कर्मचारी कामात न डगमगता डय़ुटी बजावत आहेत. मात्र, तटपुंज्या मानधनात कुटुंबाचा गाडा हाकताना कसरत करण्याची वेळ आली आहे. महिला सफाई कर्मचाऱयांना तर महिलांच्या प्रसुती विभागात कामाचा ताण असतो. मात्र, त्यांनी न डगमगता व जीवाची पर्वा न करता प्रामाणिक काम केले. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने कंत्राटी सफाई कर्मचाऱयांच्या मानधनात मासिक आठ ते दहा हजार रुपये वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी कोल्हापूर येथील ठेकेदाराकडून कर्मचाऱयांना मासिक सात हजार रुपये मानधन देण्यात येत होते. त्यानंतर या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर शासनाकडून अद्याप ठेकेदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पर्याय म्हणून ठेकेदाराची निविदा मागविली. स्थानिक ठेकेदाराने कमी दराची निविदा भरल्याने त्याप्रमाणे पूर्वी असलेल्याच कर्मचाऱयांना कामावर घेत रोजीरोटीचा प्रश्न सोडविला आहे.









