प्राध्यापकांच्या 3 हजार 64 रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच
पुणे / प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे बंद असलेली महाविद्यालये १५ सष्टेंबरपासून सुरु करण्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. तसेच 3 हजार 64 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असे ग्वाही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच जुलै किंवा आॅगस्टमध्ये सीईटी परीक्षा होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. प्रसंगी प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, संचालक धनराज माने यांच्यासह वरि÷ अधिकारी उपस्थितीत होते. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने 21 जून पासून विविध मागण्यांच्यासंदर्भात करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सामंत म्हणाले, भरती संदर्भात येत्या दोन दिवसांत वित्त विभाग आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेणार आहे. 2020 या वर्षापर्यंत एकूण रिक्त पदे गृहित धरुन 700 पदांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तासिका तत्त्वावर काम करणाऱया प्राध्यापकांना 48 मिनीटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सीएचबी संदर्भात संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षेतेखाली समिती गठित करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला. 121 ग्रंथपाल भरती तसेच विद्यापिठातील शिक्षकीय 659 भरती करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट् राज्य ग्रंथपाल महासंघाच्यावतीने 28 जून रोजी करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे.
15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न
एआयसीटीईने 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे सूचना केल्या आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, यासाठी 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
ऑक्सीपार्कच्या मुद्यावरून विद्यापीठाला इशारा
सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात वषानुवर्षे असलेली झाडे आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी ऑक्सीपार्कच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे घेणे चुकीचे आहे. मी नागरिकांच्या बाजूने असून विद्यापीठाने पैसे आकारू नयेत, यासाठी रोष पत्करायला तयार आहे. ऑक्सीपार्कसाठी विद्यापीठाने पैसे आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी माझ्याशी संवाद साधला. त्यावर ऑक्सीपार्कच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. विद्यापीठाने स्वत:चे पैसे खर्च करून उत्तम ऑक्सीपार्कची निर्मिती करावी आणि मग नागरिकांकडून शुल्क वसूल करावे, असेही सामंत यांनी सांगितले.
महाविद्यालयांचे शुल्क कपातीचा निर्णय होण्याची शक्यता
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे 25 टक्के शुल्क माफ केले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व विद्यापीठांना `टÎूशन फी’ वगळून इतर शुल्क कमी करता येऊ शकते का? याबाबत शुल्क नियंत्रण प्राधिकरणाकडून (एफआरए) शुल्क कपाती बाबत सुवर्णमध्य काढला जाईल. सोमवारी राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत बैठक होणार असल्याने त्यामध्ये विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांचे शुल्क कपात करावी, अशी सूचना करणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. ग्रंथालय, वीज, इमारत देखभाल, प्रयोगशाळा, क्रीडांगण यासह इतर शुल्क कमी करात येऊ शकते. मात्र, विद्यापीठे हे स्वायत्त असल्याने त्यांच्यावर शुल्क कपातीबाबत दबाव टाकू शकणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये सीईटी
इयत्ता 12वीचा निकाल लागल्यानंतर व गुणपत्रिका हातात आल्यानंतरच अभियांत्रिकीसह इतर पदवी अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा होऊ शकते. ही परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवडÎात घेतली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.








