वृत्तसंस्था/ हैदराबाद
लखनौ सुपर जायंट्सचा सामना आज शनिवारी सनरायजर्स हैद्राबादशी होणार असून त्यावेळी लखनौचा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न राहणार आहे. युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईवर याबाबतीत महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. लखनौने त्यांच्या मागील तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. जर त्यांनी 10 संघांच्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर असलेल्या एडन मार्करमच्या हैदराबादला पराभूत केले, तर ते पुढे टाकलेले एक मोठे पाऊल ठरेल.
कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ सध्या 11 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे आणि ‘प्ले-ऑफ’मधील स्थानाच्या शर्यतीत पुढे आहे. हैदराबादमधील खेळपट्टीचा विचार करता आज फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची राहणार आहे आणि तिथेच बिश्नोई, अनुभवी अमित मिश्रा आणि कर्णधार कृणाल हे चित्रात येतात. हैदराबादच्या फलंदाजांना वरील फिरकी त्रिकुटाच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. हैदराबादची फलंदाजी एडन मार्करम, हेन्रिक क्लासेन आणि ग्लेन फिलीप्स या त्यांच्या तीन परदेशी खेळाडूंवर अवलंबून आहे. 13.25 कोटी ऊपयांना करारबद्ध केलेल्या हॅरी ब्रूकला 9 सामन्यांत केवळ 163 धावा काढता आल्याने आता फिलीप्सची संघात वर्णी लागली आहे.
लखनौ संघाचा 12 बळींसह सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला बिश्नोई त्याच्या वेगवान गुगलीच्या जोरावर वरील परदेशी त्रिकुटाला त्रास देऊ शकतो. शिवाय मिश्रा आणि कृणालची अचूक गोलंदाजी महत्त्वाची ठरू शकते. हैदराबादमधील खेळपट्टी ही थोडी संथ असून जे फिरकी गोलंदाज जास्त वेगाने गोलंदाजी करतात त्यांना येथे इतरांपेक्षा नक्कीच जास्त फायदा होईल. फिरकी माऱ्याच्या बाबतीत लखनौचे पारडे हैदराबादपेक्षा भारी आहे. कारण हैदराबादचा वॉशिंग्टन सुंदर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यांच्यातर्फे सातत्याने चांगली कामगिरी करणारा एकमेव फिरकी गोलंदाज हा मयंक मार्कंडे आहे त्याने 7.31 च्या इकोनॉमी रेटने आठ सामन्यांत 11 बळी घेतले आहेत.
कागदावर चांगला संघ दिसणाऱ्या हैदराबादला अनेक गोष्टींचा फटका बसला आहे. पण प्रामुख्याने मयंक अग्रवाल (9 सामन्यांत 187 धावा) आणि राहुल त्रिपाठी (10 सामन्यांत 237 धावा) या दोन प्रमुख भारतीय फलंदाजांचा फॉर्म हरवणे त्यांना बाधले आहे. क्लासेन (स्ट्राईक रेट 185.34) वगळता 150 पेक्षा जास्त स्ट्राइक-रेट असलेला वरच्या फळीतील एकमेव फलंदाज हा सलामीवीर अभिषेक शर्मा (152.63) आहे. लखनौच्या बाबतीत नियमित कर्णधार के. एल. राहुलला झालेली दुखापत ही एक प्रकारे त्यांना फायदेशीर ठरली आहे. कारण क्विंटन डी कॉक आणि काइल मेयर्स हे दोघेही पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण करतात.
मार्कस स्टोइनिस (239 धावा) आणि निकोलस पूरन (248 धावा) यांनीही चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांनी आणखी योगदान देण्याची गरज आहे. आयुष बडोनी (212 धावा) हा देखील खूप प्रभावी ठरला आहे. आजच्या दूरस्थ सामन्यात फलंदाजीच्या ताकदीचा जास्तीत जास्त वापर करण्याची संधी लखनौला मिळणार असली, तरी त्यांना भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन या जोडीचा गोलंदाजीत सामना करावा लागेल हे विसरून चालणार नाही.
संघ : सनरायजर्स हैदराबाद : एडन मार्करम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलीप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, फजलहक फाऊखी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेन्रिक क्लासेन, आदिल रशिद, मयंक मार्कंडे, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र यादव, मयंक डागर, नितीशकुमार रे•ाr, अकेल होसेन व अनमोलप्रीत सिंग.
लखनौ सुपर जायंट्स : कृणाल पंड्या (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, अमित मिश्रा, निकोलस पूरन, नवीन उल हक, आयुष बडोनी, आवेश खान, करण शर्मा, युधवीर चरक, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, मार्क वुड, स्वप्नील सिंग, मनन वोहरा, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम, मार्कस स्टोइनिस, रवी बिश्नोई, कऊण नायर आणि मयंक यादव.









