तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी : महापालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे

प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर परिसरात भटक्मया कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही भटकी कुत्री मुलांवर अचानक हल्ला करत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तातडीने या भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या कुत्र्यांबरोबरच रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा महापालिकेने मोकाट कुत्री व जनावरे यांचा बंदोबस्त तातडीने करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सदाशिवनगर येथे भटकी कुत्री अचानक लहान मुलांवर हल्ला करत आहेत. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. 10 ते 15 कुत्र्यांचा कळप अचानक हल्ला करत असल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्यावेळीही दवाखान्याला जाताना त्यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. तेंव्हा या कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सदाशिवनगरच्या मुख्य रस्त्यावरच ही कुत्री ठाण मांडून आहेत. याचबरोबर या परिसरातच भर रस्त्यामध्ये मोकाट जनावरेही बसून आहेत. तेंव्हा त्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. एकूणच महापालिकेने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा कोणतीही घटना घडल्यास महापालिकेला जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.









