प्रतिनिधी / कोल्हापूर
विचारे माळ येथील समाजमंदिराच्या प्रवेशद्वारावर काळी शाई फेकून विटंबना करण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. अवैध दारू व्यवसायाच्या संघर्षातून हा प्रकार घडल्याचे समोर आले होते. अशा घटनांना कायमचे थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीने पोलीस अधीक्षकांना भेटून हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु यावर अध्याप कार्यवाही न झाल्याने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
परिसरातील अवैध धंदे बंद व्हावेत, त्याठिकाणी नवीन धंदे सुरू होऊ नयेत यासाठी पोलीस निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील 4 नागरिक, 2 पोलीस कर्मचारी व 1 पोलीस-उपनिरीक्षक अशी अवैध धंद्यांविरोधातील दक्षता समिती तयार करण्यात ही प्रमुख मागणी घेऊन उपोषण करण्यात आले. तसेच, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे समाजमंदिराची विटंबना करणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली.
या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ’आप’चे संदीप देसाई यांनी दिला. यावेळी आपचे प्रभाग प्रमुख विजय हेगडे, श्रेया हेगडे, कल्पना शेंडगे, लखन मोहिते, सचिन शेटे, किशोर दाभाडे, अमर हेगडे, सूरज सुर्वे, इलाही शेख, मयूर भोसले, इम्रान सरगर पियुष हेगडे प्रसाद हेगडे ओमकार तलवारे कुमार भोसले आदेश हेगडे, रोहन वाघमारे, किशोर खाडे आदी उपस्थित होते.