चिपळूण
चिपळूण शहरातील गोवळकोट-कदमवाडीतील बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसनाबाबत आपण शासनास दिलेले पत्र चुकीचे असून सत्यता न पडताळता अनावधानाने ते पाठवले असल्याची कबुली काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी दिली. पुनर्वसन लढय़ामध्ये आपणही बाधित कुटुंबिय व पुनर्वसन समितीसोबत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
शनिवारी दलवाई चिपळूण दौऱयावर आले असता त्यांनी गेल्या 30 वर्षापासून गोवळकोट-कदमवाडीतील कुटुंबियाचा पुनर्वसन प्रश्न रखडल्याने त्यातच तो दलवाई यांच्यामुळे रखडला असल्याच्या झालेल्या आरोपानंतर त्यांनी बाधित कुटुंबिय सध्यस्थितीत रहात असलेल्या विदारक परिस्थितीची पाहणी केली. तसेच गोवळकोट-कदमवाडीतील बाधित कुटुंबिय व पुनर्वसन समितीच्या पदाधिकाऱयांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान समितीचे पदाधिकारी सुभाष जाधव यांनी बाधित कुटुंबियांच्या व्यथा मांडताना तुमच्या एका पत्रामुळे येथील कुटुंबे देशोधडीला लागली असून यामुळे एक पिढी बरबाद झाल्याचा गंभीर प्रकार दलवाई यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यातच दलवाई यांच्यासमोर त्यांनी शासनास 12 ऑगस्ट 2011 रोजी दिलेले पुनर्वसन थांबवणारे पत्र वाचून दाखवण्यात आले. यावर दलवाई यांनी आपण दिलेले पत्र हे चुकीचे असून झालेली चूक मान्य करुन ते पत्र सत्यता न पडताळता अनावधानाने पाठवले गेल्याची कबुली ग्रामस्थ व समितीसमोर दिली. तसेच 26 जानेवारीला रोजी होणाया उपोषणाला त्यांनी पाठिंबाही दर्शवला आहे.
या दरम्यान, दलवाई यांनी गोवळकोट धक्का मैदानाशेजारील शासकीय मालकीच्या यापूर्वी शासनाने पुनर्वसनासाठी निश्चित केलेल्या जागेची खासदार दलवाई यांनी पाहणी केली. पुनर्वसनसाठी ही जागा योग्य असून या जागेतच पुनर्वसन करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी बाधित कुटुंबे तसेच पुनर्वसन समितीला दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष भगवान बुरटे, उपाध्यक्ष किरण बांद्रे, सुरेश कदम, सहसचिव श्रीराम शिंदे, संतोष मोहिते, उपाध्यक्ष सुरेश कदम, सचिव उदय जुवळे, संतोष मोहिते, सदस्य प्रशांत पोतदार सचिन मोहिते, राजेश जाधव, उमेश सकपाळ, प्रशांत मोहिते, दीपक निवाते, विजय कदम आदी उपस्थित होते.









