येडियुराप्पा आणि डी.के. शिवकुमार या दोन्ही नेत्यांची वाटचाल जवळजवळ एकाच पद्धतीने होताना दिसते आहे. बाह्य शत्रुंपेक्षा आपल्या अवतीभोवती वावरणाऱयांचा धोका यांना अधिक आहे. शेवटी सत्तेसाठीच्या राजकारणात असे खेळ होतच राहतात.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या घरांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. बेंगळूर येथील आर. आर. नगर व तुमकूर जिह्यातील शिरा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. डी. के. शिवकुमार, त्यांचे भाऊ खासदार डी. के. सुरेश यांच्याशी संबंधित 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यापूर्वीही शिवकुमार यांना अटक झाली होती. तिहार जेलमधून सुटका झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. राजकीय हेतूने प्रेरीत होऊन केंद्र सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यापूर्वी शिवकुमार यांना अटक झाली त्यावेळीही असाच आरोप झाला होता. गुजरात विधानसभेतून अहमद पटेल हे राज्यसभेसाठी उमेदवार होते, त्यावेळी घोडाबाजार रोखण्यासाठी गुजरातमधील काँग्रेस आमदारांना बेंगळूरला स्थलांतरीत करण्यात आले होते. तेव्हापासून शिवकुमार यांच्यामागे शुक्लकाष्ठ लागले आहे.
गुजरातमधील आमदारांच्या वास्तव्याची जबाबदारी शिवकुमार यांनी घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्यावर ईडी, सीबीआय कारवाईचा सपाटा सुरू आहे. सीबीआय म्हटले की पिंजऱयातील पोपट अशी ओरड जुनीच आहे. केंद्रात कोणाचीही सत्ता येवो या केंद्रीय यंत्रणा सत्ताधीशांच्या इशाऱयावर चालत असतात. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी त्यांनीही आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी अशा यंत्रणांचा वापर केला आहे. आता नेमके तेच होत असल्याचा आरोप केला जात आहे. बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून शिवकुमार यांच्या निवासस्थानांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. कर्नाटकात अलीकडे निवडणुका आल्या की आयटी, ईडी, सीबीआय छापे सुरू होतात. केंद्रात काँग्रेस सत्तेवर असताना सीबीआय म्हणजे ‘काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन’ असल्याची व्याख्या भाजप नेते करीत होते. आता परिस्थिती बदलली आहे. सीबीआयवर आरोप करणाऱयांच्या जागेवर काँग्रेस नेते आले आहेत.
2017 मध्ये अहमद पटेल यांची राज्यसभेवर नियुक्ती होऊ नये यासाठी भरपूर प्रयत्न झाले. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गुजरातमधील काँग्रेस आमदारांना भाजप नेतृत्वाने गळ घातली होती. अशा परिस्थितीत तेथील आमदारांना कर्नाटकात आणून त्यांना इगल्टन् रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. हायकमांडने सोपविलेली जबाबदारी शिवकुमार यांनी व्यवस्थितपणे पार पाडली होती. त्याचवेळी इगल्टन् रिसॉर्टवरही ईडीने छापा टाकला होता. नंतरच्या काळात तर त्यांना अटकही करण्यात आली होती. शिवकुमार यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर प्रथमच दोन विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. शिरा मतदारसंघ यापूर्वी निजदच्या ताब्यात होता तर आर. आर. नगरवर काँग्रेसचे वर्चस्व होते. या दोन्ही पक्षांसमोर आपापले वर्चस्व टिकवून ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तर सत्ताधारी भाजपसाठीही ही निवडणूक प्रति÷sची ठरणार आहे. एकीकडे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना बदलण्यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढत चालला आहे. हायकमांडच्या मनातही त्यांना बदलायचे आहे, असेच चित्र सध्या पहायला मिळते.
आर. आर. नगर व शिरा मतदारसंघात वक्कलीग समाजाचे वर्चस्व आहे. डी. के. शिवकुमार हे स्वतः वक्कलीग समाजाचे नेते आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे या दोन्ही मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण तयार केले जात आहे. शिवकुमार यांच्यावरील कारवाईमुळे वक्कलीग समाजाने भाजपची साथ सोडली तर पक्ष आणि सरकारवर येडियुराप्पा यांची पकड ढिली झाली आहे, असा अर्थ होतो. हेच कारण पुढे करून त्यांना पायउतार होण्यास भाग पाडता येते, असा तर्कही यामागे काम करतो आहे का? 2023 ला आपणच कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावर असणार असा चंग बांधून मैदानात उतरलेल्या शिवकुमार यांच्या गळय़ात सीबीआयचा पट्टा अडकवतानाच दुसरीकडे येडियुराप्पा यांचा वेग रोखण्याची योजकताही या कारवाईमागे असणार का असा संशय बळावत चालला आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही कर्नाटकात प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱयांनी 46 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये निजद नेत्यांशी संबंधित 22 व काँग्रेसशी संबंधित 16 जणांवर कारवाई करण्यात आली होती. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निकटवर्तीयांच्या घरावरही छापे टाकण्यात आले होते. कुंदगोळ विधानसभा पोटनिवडणुकीच्यावेळीही कुसुमा शिवळ्ळी यांच्या समर्थकांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. निवडणुकीच्या तोंडावर छापे टाकण्याची परंपरा जुनीच आहे. माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या नातूबरोबर शिवकुमार यांच्या कन्येचा विवाह ठरविण्यात आला आहे. मुलीच्या लग्नासाठी बनविलेले दागिनेही सीबीआयने जप्त केल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला आहे.
अलीकडेच नदीत उडी घेवून आत्महत्या केलेल्या कॉफी डेचा मालक सिद्धार्थ हे एस. एम. कृष्णा यांचे जावई. सिद्धार्थच्या मुलाबरोबर शिवकुमार यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे. सीबीआयच्या छाप्यानंतर शिवकुमार यांनी आपल्या मतदारांना व समाजाला भावनिक साद घातली आहे. केंद्र सरकारने आपल्या विरुद्ध षड्यंत्र रचले आहे. अशा षड्यंत्रांना आपण घाबरणार नाही, असा पवित्रा शिवकुमार यांनी घेतला आहे. जशी भाजपमध्ये येडियुराप्पा यांची अवस्था आहे तशीच अवस्था शिवकुमार यांची काँग्रेसमध्ये झाली आहे. येडियुराप्पा यांचा पायउतार व्हावा यासाठी प्रयत्नशील असणाऱयांची संख्या त्यांच्याच पक्षात अधिक आहे. आणि याची पुरेपूर जाणीव येडियुराप्पांनाही आहे. पुढची तीन वर्षे आपणच मुख्यमंत्री असणार असे येडियुराप्पांना वारंवार सांगावे लागत आहे. याचाच अर्थ त्यांना बदलण्यासाठी पक्षात प्रयत्न वाढले आहेत. तसेच शिवकुमार यांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी काँग्रेसमधील अन्य नेत्यांची धडपड सुरू आहे. या दोन्ही नेत्यांची वाटचाल जवळजवळ एकाच पद्धतीने होताना दिसते आहे. बाह्य शत्रुंपेक्षा आपल्या अवतीभोवती वावरणाऱयांचा धोका यांना अधिक आहे. शेवटी सत्तेसाठीच्या राजकारणात असे खेळ होतच राहतात. कर्नाटकात सध्या तेच सुरू आहे.
रमेश हिरेमठ








