पूजा रानीही शेवटच्या चारमध्ये, पांघल, बोर्गोहेन पराभूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील कॅस्टेलिनो येथे सुरू झालेल्या 35 व्या बॉक्सन आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या सतीश कुमार (91 किलोवरील गट) व आशिष कुमार (75 किलो गट) यांनी आपापल्या गटातून उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे. याशिवाय सुमित सांगवान (81 किलो) यानेही उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र जागतिक अग्रमानांकित अमित पांघलचे (52 किलो) आव्हान संपुष्टात आले.
सुमित सांगवानने बेल्जियमच्या मोहोर अल झियादवर 4-1 अशा फरकाने मात करीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. भारताचा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला पहिला सुपरहेविवेट गटातील बॉक्सर सतीश कुमारने डेन्मार्कच्या गिवस्कोव्ह नील्सनवर 5-0 अशी एकतर्फी मात केली तर आशियाई रौप्यविजेत्या आशिष कुमारने इटलीच्या रेमो साल्वातीला 4-1 असे नमवित पदकाच्या फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत भारताच्या एकूण दहा बॉक्सर्सनी उपांत्य फेरी गाठली असून त्यात सहा पुरुष व चार महिलांचा समावेश आहे.
गुरुवारी उशिरा झालेल्या लढतीत मोहम्मद हुसामुद्दिन (57 किलो गट), मनीष कौशिक (63 किलो), विकास कृष्णन (69 किलो) यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले. हुसामुद्दिनने इटलीच्या सिमोन स्पाडाचा 5-0 असा पराभव केला. त्याची उपांत्य लढत पनामाच्या ओरलँडो मार्टिनेझशी होणार आहे. मनीष कौशिकने कझाकच्या झाकिर सैफिउलिनचा चुरशीच्या लढतीत पराभव केला तर विकास कृष्णनलाही इटलीच्या व्हिसेन्झो मॅग्नियाकेपरवर विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. मात्र जागतिक अग्रमानांकित अमित पांघलला (52 किलो) पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. युरोपियन सुवर्णविजेत्या गॅबियल इस्कोबारने त्याला हरविले.
महिलांमध्ये एमसी मेरी कोम (51 किलो गट), आशियाई चॅम्पियन पूजा रानी (75 किलो), सिमरनजित कौर (60 किलो) व पदार्पण करणारी जस्मिन (57 किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. लवलिन बोर्गोहेनला मात्र उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या सादत डॅल्गातोव्हाकडून 0-5 असा पराभव स्वीकारावा लागला. तिच्याप्रमाणे मनीषा मौन (57 किलो) हिलाही पराभवाचा धक्का बसला. इटलीच्या इरमा तेस्ताने हरविले. या स्पर्धेत 17 देशांच्या बॉक्सर्सनी भाग घेतला असून त्यात रशिया, अमेरिका, इटली, कझाकस्तान या देशांचाही समावेश आहे. पूजा रानीने इटलीच्या असुंता कॅनफोराचा पराभव केला.









