अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतातील शेरील मॅकग्रेगर नामक महिलेचे वय 62 वर्षांचे आहे. इतकेच नव्हे तर तिला सतरा नातवंडेही आहेत. पण तिचे 24 वषीय कुरेन मॅकेन नामक युवकावर प्रेम जडले. एक वर्ष डेटिंग केल्यानंतर नुकतेच हे दोघे विवाहबद्ध झाले. अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच विवाह मानण्यात येत आहे.
प्रेमाला वय आदी भेदाभेद मान्य नसतात, असे नेहमी बोलले जाते. तथापि, 62 वर्षांची वधू आणि 24 वर्षांचा वर ही जोडी मात्र या बोलण्याच्याही पलीकडची आहे. असे सांगितले जाते, की कुरेन जेव्हा पंधरा वर्षांचा होता, तेव्हा त्याची शेरीलबरोबर पहिली भेट झाली. त्यानंतर 2020 मध्ये कुरेन 23 वर्षांचा असताना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा दोघे एकमेकांना भेटले आणि त्यांचे डेटिंग सुरू झाले. नुकताच त्यांनी अमेरिकेतील टेनेसी येथे विवाह केला. त्यानंतर मोठी पार्टी करण्यात आली आणि जोडपे हनीमूनसाठी रवाना झाले. त्यांच्या विवाहाचे चित्रिकरण व्हायरल झाले आहे आणि त्याला असंख्य लाईक्स मिळालेल्या आहेत.









