प्रतिनिधी/ चिपळूण
मियावाकी हे जपानी तंत्रज्ञान असले तरी झाडांची गर्दी होणे हे सद्यस्थितीत महत्वाचे आहे. झाडांविषयीच्या संवेदना समाजमनात वाढत चालल्या आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रात सातत्याने येत असलेली नैसर्गिक आपत्ती काही गंभीर इशारा देत आहेत. त्यामुळे आता सर्वांनी सजग होणे आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून जाणे महत्वाचे असल्याचे उद्गार नाम फाऊंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी काढले.
ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेच्या माध्यमातून धामणवणे येथील डोंगरात मियावाकी फॉरेस्ट हे तंत्राने जंगल तयार करण्याच्या प्रकल्पाचा वृक्ष लागवडीने शुभारंभ करण्यात आला. मकरंद अनासपुरे यांच्याहस्ते आणि आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
अलिकडे झाडांबाबतची संवेदना समाजमनात वाढत चालली आहे हे फारच दिलासादायक आहे. मियावाकीसारखा प्रकल्प हे जरी जपानी तंत्रज्ञान असले तरी झाडांची गर्दी त्यातून साध्य होणार आहे. आज पश्चिम घाटाचे संवर्धन ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रात जे काही हिरवेगार जंगल शिल्लक आहे त्याचे सवंर्धन करणे महत्वाचे आहे. राज्यातील एकामागोमाग आलेल्या नैसर्गिक आपत्ती आपल्याला गंभीर इशारा देत आहेत. अलीकडेच निसर्ग चक्रीवादळ झाले. त्यापूर्वी फयान सारख वादळ झाले. यासगळय़ातून सजग होऊन निसर्ग संवर्धनाची कास धरणे गरजे आहे. पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून जाणे महत्वाचे आहे. चार वर्षांच्या कमिटमेंटनंतर येथे आज आलो आहे. कारण झाडांची संख्या वाढत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातील बरीच संवेदनशील मंडळी पुढे येत आहेत ही आनंदाची बाब आहे.
प्रत्येकालाच झाडांची गरज आहे, कारण ऑक्सीजन सर्वांनाच आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे ऑक्सीजनचे महत्व सर्वांच्या लक्षात आले आहे. व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने अनेक रूग्णांचे हालही आपण पाहिले आहेत. त्यामुळे यातून धडा घेऊन काम करण्याची गरज आहे. 2016मध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्लोबल संस्था आणि नाम फाऊंडेशनने 650 झाडे लावून ती जगवली आहेत. झाडे लावण्यापेक्षा ती जगवणे आणि वाढवणे महत्वाचे आहे. झाडांची संख्या आणि त्याचे संगोपन ही कोकणची गरज आहे. या एकमेव हिरव्यागार टापूचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य भाऊ काटदरे, प्रा. प्रकाश राजेशिर्के, ग्लोबल संस्थेचे अध्यक्ष राम रेडीज, सचिव संजीव अणेराव, समीर जानवलकर, निलेश बापट, रमण डांगे, मनोज गांधी, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, व्यवस्थापक विश्वास पाटील यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.









