आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा इशारा : कोणताही धर्म आणि देव धोका पत्करण्याची शिकवण देत नसल्याचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या सात-आठ महिन्यांपासून देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. हा संसर्ग अद्यापही कमी झालेला नसल्यामुळे सद्यस्थितीत लोकांनी कोणताही धोका पत्करू नये. नजीकच्या काळात दसरा-दिवाळीसारखे सण येत असले तरी कोरोनापासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येकाने स्वतः कोरोनामुक्त राहण्यासाठी काळजी घेतलीच पाहिजे, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.
नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण आता जवळ आलेले आहेत. या सणांमध्ये गर्दी टाळतानाच कोरोनापासून बचावाचे सर्व उपाय लोकांनी अंगिकारले पाहिजेत. कोरोना हा विषाणू संसर्गामुळे होणारा आजार असल्यामुळे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे यांचा अवलंब अत्यावश्यक आहे. अशा सणांच्यावेळी कोरोनापासून बचावाच्या पद्धतींचा अवलंब करण्यास आपण कमी पडलो तर भविष्यात कोरोना पुन्हा एकदा भयंकर रूप धारण करू शकेल, अशी भीतीही आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. तसेच कोणताही धर्म किंवा देव धोका पत्करण्याची शिकवण देत नसतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘संडे संवाद’ कार्यक्रमांतर्गत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना साथीवर विचारलेल्या अनेक प्रश्नांबाबत बोलताना कोरोनासंबंधीच्या विविध मुद्दय़ांना स्पर्श केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी सणांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या तत्वांचे पालन करण्याची सूचना डॉ. हर्षवर्धन यांनी केली.
लोकांच्या जीवाचे रक्षण करा
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी लोकांना पाश्चिमात्य परंपरेपासून दूर जाण्याचे व भारतीय परंपरेचे पालन करण्याचे आवाहनही केले आहे. लोकांचा जीव धोक्मयात घालून सण साजरे करण्याची शिकवण कोणत्याही धर्मातील धर्मगुरु अथवा देव देत नाही. तसेच स्वत:चा जीव धोक्यात घालून आपली मोठय़ा मंडपात उपासना करा, असेही देव सांगत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर तुम्ही तुमच्या धार्मिक भावना व श्रद्धा यांच्यानुसार पूजा मंडपात जात असाल तर त्याठिकाणी कोरोना नियमावलीची अंमलबजावणी कराच. शिवाय ‘लोकांच्या जीवाचे रक्षण करणे हा माझा पहिला धर्म आहे’ याची जाणीवही प्रत्येकाने ठेवावी, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
लसीबाबत अफवांवर विश्वास नको!
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लसीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. वृद्धांऐवजी तरुणांना पहिल्यांदा कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस देण्याची सरकारची योजना असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याची सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. लसीकरणाबाबत संशोधक आणि वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार सरकार योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना लसीबाबत सरकारने आजपर्यंत कोणतीही खोटी घोषणा केलेली नाही, असेही ते पुढे म्हणाले.









