आईच्या पोटी जन्म मिळाला म्हणून प्रत्येक जीव आनंदाने रडत असतो आणि आपण जिवंत असल्याचं भान साऱयांना येतं तेव्हा आईचे भरून आलेले डोळे अन् रडणाऱया बाळाचे डोळे यात कुठेतरी साम्य असतेच. दोघांचा आनंद एकरूप होऊन जणू वाहत असतो. डोळे भरून येणं म्हणजे नेमकं सुख किंवा दुःख सांगता येत नसलं तरी ती एका उत्कट भावनेचे सीमारेषा असते. असे डोळे भरून यायला कोणता प्रसंग घडायला लागतोच असे नाही. उलट एकांतात एकटेपणात त्याला जास्त मोकळेपणा मिळतो. कुसुमाग्रजांच्या भाषेत मी आणि माझ्यातला मी एकमेकांशी बोलायला लागले की डोळे भरून येण्याची प्रक्रिया सुरू होते. आम्ही कुणाला आठवणी सांगायला लागलो की, डोळय़ांची विहीर काठोकाठ भरून वाहते. गंगा यमुनेच्या नावाने हे डोळे प्रवाहित व्हायला लागतात. आपल्या बाळाने धरून ठेवलेलं बोट, त्याने टाकलेलं पहिलं पाऊल किंवा उच्चारलेला पहिला शब्द आमचे डोळे भरून यायला पुरेसा होतो. मुलाला पाळणा घरात सोडून जाताना किंवा बालवाडीच्या वर्गात मावशीकडे सोपवताना होणारी मनाची घालमेल शब्दांपेक्षाही डोळय़ातून जास्त उत्कटपणे पाझरते. शाळेच्या गर्दीत एकदम आई दिसेनाशी झाल्यावर डोळय़ांचे जे काही बांध फुटतात ते कमालीचे असतात. मुलाचा हट्ट परिस्थितीमुळे पूर्ण न करणारे सहलीवरून उशीर झाला तरी ताटकळत उभे असणारे बाबा, आजारपणात हॉस्पिटलात हेलपाटे घालताना डोळय़ाच्या कडा निग्रहाने कोरडय़ा ठेवतात पण मुलीच्या पाठवण्याच्या वेळी मात्र अश्रूंना वाट मोकळी करून देतात. क्रिकेटमधली सेंचुरी किंवा ऑलिंपिकचे पदक मिळवताना बघून आपल्या देशाचा झेंडा फडकताना बघून आमचे डोळे अभिमानाने भरून येतात. एखादी वस्तू किंवा वास्तू बघून अंतरीच्या समाधानाने भरून आलेले डोळे मनाला समाधानाचे पांघरूण घालतात तर एखाद्या अपमानाच्या आठवणींनी भरून आलेले डोळे मनाचे सांत्वन करतात. पांडुरंगाची मूर्ती प्रत्येक गावात असते तर असतेच की पण वारी बरोबर चालत जाऊन त्या पांडुरंगाचे दर्शन न घेताच फक्त कळसाचे दर्शन घेणारे आपल्या डोळय़ात त्या विठ्ठलाला साठवत असतात आणि तेच दर्शन पाण्याच्या रूपात आमच्या डोळय़ातून वाहत असतं. एकनाथांचे हृदय माझ्या द्यावं, वारकऱयांची भक्ती माझ्या डोळय़ात साठवावी, संतांची विश्वबंधुत्वाची कल्पना कळावी म्हणजेच अहं ब्रह्मासमी ही अवस्था आली की तुमच्या डोळय़ाचे रांजण काठोकाठ भरलेच म्हणून समजा हा सजल नयनांचा खेळ मनाला कायमच स्पर्शून जातो.
Previous Articleअर्जुन बबुता, विवान कपूर राष्ट्रीय विजेते
Next Article ऑस्ट्रेलियाच्या डावात लाबुशेनचे नाबाद दीडशतक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








