सध्या एकच विमानफेरी सुरू : प्रवाशांची गैरसोय, सकाळच्या फेरीसाठी प्रवासी हुबळीवर अवलंबून
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर शहराला यापूर्वी बेळगावमधून तीन विमानफेऱया होत्या. परंतु मध्यंतरी यातील दोन फेऱया रद्द करण्यात आल्या. सध्या एकच फेरी सुरू असून सकाळच्या सत्रात विमान नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेळगाव-बेंगळूर या दरम्यान प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असल्यामुळे या मार्गावर सकाळच्या सत्रात विमानफेरी सुरू करण्याची गरज आहे.
सध्या इंडिगो विमान कंपनी बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या मार्गावर विमानसेवा देत आहे. दुपारी 3.55 वा. बेंगळूर येथून निघालेले विमान सायंकाळी 5.20 वा. बेळगावला पोहोचते तर 5.40 वा. बेळगावहून निघालेले विमान सायं. 7.10 वा. बेंगळूरला पोहोचते. सकाळच्या सत्रात विमान नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बेंगळूर ते बेळगाव ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी, राजकारणी, उद्योजक या विमानाने बेळगावमध्ये येतात. स्पाईस जेटचे विमान सकाळच्या सत्रात असल्यामुळे प्रवाशांची सोय होत होती. परंतु नोव्हेंबर 2021 पासून तांत्रिक कारणाने ही विमानफेरी बंद झाली. त्यातच स्टार एअरनेही आठवडय़ातून दोन दिवस असणारी विमानफेरीही बंद केली. यामुळे इंडिगोच्या सेवेवर प्रवाशांना अवलंबून रहावे लागते.
बेंगळूरहून विमानफेरी सुरू करण्याची मागणी
ज्या प्रवाशांना सकाळच्या सत्रात बेंगळूरहून बेळगावला यायचे आहे, त्यांना हुबळी विमानतळावर अवलंबून रहावे लागते. सकाळी 6 वा. बेंगळूर येथून निघालेले विमान 7.40 वा. हुबळीला पोहोचते. तेथून वाहनाने प्रवासी बेळगावला पोहोचत आहेत. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे येणारे प्रशासकीय अधिकारी याच मार्गाचा वापर करत आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रात बेंगळूरहून विमानफेरी सुरू करण्याची मागणी होत आहे.









