असं म्हटलं जातं की संस्काराच्या मजबूत पायावर युगपुरुष घडतात. शिवाजी, संभाजी, बाजी, तानाजी असे अनेक कीर्तिवान पुरुष संस्काराच्या भक्कम पायावर हिंदुंचं राज्य उभं करू शकले. आज प्रत्येक पालक ‘संस्कार’ म्हणून काय शोधतोय? हे आपलं आपल्यालाच कळणं कठीण झालं आहे.
संस्कार ही एक दृश्य संकल्पना आहे. ती एखाद्या व्यक्तीच्या उक्ती आणि कृतीतून व्यक्त होत असते. एखाद्या प्रथमदर्शनातच त्या व्यक्तीचा वक्तशीरपणा, आदाब, संघभावना समाजाच्या मनावर ठसा उमटवून जाते. संस्कार म्हणजे शिस्त, संस्कार म्हणजे विनम्र भाव, संस्कार म्हणजे थोरामोठय़ांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी. संस्कार ही एक मनाची परिभाषा, मनाची अवस्था आहे. स्व पासून सुरु होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आदर्शाप्रत पोचवू शकतो.
संस्कार हा कालातीत आहे. समाजाला संस्कारांची गरज पिढय़ानपिढय़ा भासत आली आहे. सांप्रत काळात त्याची आवश्यकता जरा जास्तच आहे, एवढेच. 17व्या शतकात समर्थ रामदासांनी जे महान कार्य केले त्यात त्यांनी लिहिलेले ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे’ सारखे मनाचे श्लोक हे तर लहानथोर सर्वांच्याच मनावर संस्कार करून जातात. आपण सारे भारतीय संस्कारप्रीय आहोत. बालवयात होणारे संस्कार हे अधिक परिणामकारक असून ते आईवडील व शिक्षक यांचेकडून होत असतात. मानवाच्या ‘अनुकरणप्रियता’ या गुणामुळेच संस्कारप्रसार होत असतो. संस्काराच्या पायऱया चढतचढतच माणूस आदर्शापर्यंत पोचू शकतो. वस्तुतः संस्काराचे दोन प्रमुख प्रकार आहेत. कौटुंबिक आणि सामाजिक. मूल जन्माला येते तेव्हां सर्वप्रथम घर हेच त्याचे विश्व असते. घरातील माणसे हीच त्याची आदर्श असतात. कुटुंबियांच्या आपापसातील वागण्याचा चांगला अगर वाईट ठसा मुलांच्या मनावर उमटतो. मूल जेव्हा घराचा उंबरठा ओलांडून शेजारी व शाळेत जाऊ लागते, तेव्हा गुरुजन, शिक्षक हे त्याचेसाठी आदर्श असतात. परंतु आजच्या काळात आईवडील दोघेही करियरप्रेमी असतात. संस्कार करायला घरात आजी आजोबा असतातच, असे नाही. शाळांमधून मुलांची पटसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे तिथेही संस्काराची ऐशीतैशीच असते.
वाचन – संस्कार हा एक चांगला संस्कार पूर्वी मुलांच्या मनावर होत असे. परंतु सद्यस्थितीत ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. वाचनसंस्कार हा युवापिढीला तर अधिक परिपक्व करू शकतो परंतु काय वाचावे, याचे योग्य मार्गदर्शन त्यांना होत नाही. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आज वाचन संस्कृतीवर दूरदर्शन संस्कृतीने जबरदस्त हल्ला केला आहे. दूरदर्शन या विषयावर कांही न लिहिणेच उत्तम, या दृकश्राव्य माध्यमाच्या सततच्या माऱयामुळे माणसाची मतीच कुंठित झाली आहे.
“मातृदेवो भव, पितृदेवो भव’’ ह्या वचनाप्रमाणे ज्यांनी आपल्याला हे जग पाहण्याची संधी दिली आणि चिमुकल्या जीवाचे प्रेमाने संगोपन केले म्हणून आपण त्याची जाणीव व कृतज्ञता ठेवण्यासाठी त्यांना नमस्कार करण्याची सवय लावणे गरजेचे आहे. पण खरंच संस्कार म्हणजे नक्की काय? योग्य आचार-विचार, गुण-अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार? की जीवनात मनाला कधीही अहंकाराची बाधा होऊ न देता विनम्र असणे म्हणजे संस्कार? संस्कार शोधायला गेल्यावर, हाती नक्की काय लागतं हे मोठं प्रश्नचिन्ह आहे.
आज पालक आपल्या मुला-मुलींना जिम व स्विमिंगला जाण्याची सक्ती करतात. तसेच कम्युनिकेशन, लीडरशिप आणि प्रेझेंटेशन स्कील अशा साऱया क्लासेस मधील गोष्टी व्यक्तिमत्व विकास (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट) म्हणून आजची पिढी स्वीकारत आहे. ह्या साऱयाला संस्कारांचं बदलतं स्वरूप म्हणायचं का?
संस्कारांनी मनावर योग्य परिणाम होतात. आयुष्य समृद्ध आणि यशस्वी होण्यासाठी मदत होते. जसं एखाद्या रत्नाला पैलू पाडल्यानंतर ते रत्न पूर्वीपेक्षा तेजस्वी होतं किंवा एखाद्या चित्रात रंग भरत गेल्यावर ते जसं उठावदार आणि सुंदर दिसतं, तसं संस्कारांचा मनावर असामान्य परिणाम होऊन दिव्य तेजाचा उदय होतो. शेवटी निरोगी, सात्विक, धर्मशील आणि सामर्थ्यवान पिढी घडवणे हेच तर संस्कारांचे ध्येय असते.









