चिपळूण
कोरोना लॉकडाऊनपासून सर्वकाही ठप्प असताना घरबसल्या वाचकांनी आपला वाचनाचा छंद पुरेपूर जोपासला. कोरोना काळात ऐतिहासिक विविध ग्रंथ, कादंबऱयांसह विविध साहित्यावर वाचकांनी नजर टाकली. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे या कालावधीत संशोधनात्मक साहित्य वाचनाकडे कल वाढल्याचे चित्र होते.
मार्च महिन्यापासून जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प होते. यात ग्रंथालयाचा समावेश होता. त्यामुळे ग्रंथालयच बंद झाल्याने पुस्तक वाचनाची सवय बंद होते की काय, अशी भीती कुठेतरी सजग मनाला होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही वाचकवर्ग जपण्याच्यादृष्टीने ग्रंथालयातील कर्मचारीवर्गाने स्वतःहून पुस्तक उपलब्ध करुन देण्याची संकल्पना राबवली. अशातूनच कोरोनामुळे घरातून बाहेर न पडण्याचे आदेश असतानाही वाचकांची साहित्याची भूक मात्र भागवली गेली. ग्रंथालयातून हवी ती पुस्तके वाचकवर्गाला मिळत गेल्याने घरबसल्या वाचकांनी आपली वाचनाची आवड जपली. यामुळे या कालावधीत संशोधनात्मक साहित्य वाचनाकडे कल अधिक वाढवल्याचे दिसले. तसेच ऐतिहासिक कादंबऱयासह विविध साहित्यालाही चांगली मागणी होती. हिंडण्या-फिरण्यावर अचानक बंदी आल्याने स्वतःला पुस्तकाच्या दुनियेत हरवून घेऊन संधोधनात्मक दृष्टी ठेऊन ज्ञान मिळवण्याचे नवे समीकरण वाचकांनी आखले होते. त्यासाठी वाचकांनी विविध साहित्यावर नजर टाकली आहे.
दरम्यान, या बाबत लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे म्हणाले की, ग्रंथालयास शासनाकडून मिळणाऱया अपुऱया अनुदानाने ग्रंथालये चालवणे कठीण आहे. त्यातच ग्रंथालय कर्मचाऱयांचा पगारही निघत नाही. ग्रंथालय वाचकांच्या वर्गणीतून चालत असल्याने लॉकडाऊन काळात वाचकवर्ग जपणे महत्वाचे होते. त्यासाठी बंदी काळात वाचकांना घरबसल्या त्यांना हवी ती पुस्तके आम्ही सर्वांनी घरपोच दिली. वाचकांनी उपलब्ध झालेली पुस्तके भरभरुन वाचली आहेत. आता ग्रंथालय पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरु झाल्याने वाचकांप्रमाणेच आम्हालाही समाधानाची भावना आहे.
ग्रंथालयाच्या सुविधेमुळेच वाचनाची भूक शमली: शिंदे
लॉकडाऊनमध्ये लोटिस्माने वाचकांसाठी उपलब्ध केलेल्या घरपोच सुविधेमुळे वाचकांना पुस्तके वाचता आली. आपली साहित्य वाचनाची भूक यामुळे शमली. या काळात आपण चारित्र्य, वैचारिक कांदबऱया, ऐतिहासिक पुस्तके वाचली. आता पूर्वीप्रमाणे वाचनालय सुरु झाले याचा आनंद वाटतोय, अशी प्रतिक्रिया वाचक राजेश शिंदे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.