आमसभेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलेले मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आजच्या आव्हानांना आपण जुन्या रचनेने तोंड देऊ शकत नाही. सर्वसमावेशक सुधारणा न केल्यास संयुक्त राष्ट्रसंघावरचा विश्वास संकटात येईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या 75 व्या आमसभेस संबोधित करताना व्यक्त केले. भारत सातत्याने सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी करत आहे. इतर अनेक देशांनीही यास पाठिंबा दर्शविला आहे, याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
75 वर्षांपूर्वी युद्धाच्या भयानक परिणामांनी नवीन आशा निर्माण केली. मानवी इतिहासामध्ये प्रथमच संपूर्ण जगासाठी एक संस्था स्थापन केली गेली. भारतही त्या महान पावलाचा भाग होता, असे मोदी पुढे म्हणाले. भारत जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहणाऱया ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधीत्व करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संयुक्त राष्ट्रांमुळे आपले जग आज एक चांगले स्थान आहे. शांतता व विकासासाठी काम केलेल्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाखाली शांतता कार्यात योगदान दिलेल्या सर्वांना आम्ही मानवंदना देतो. भारताने यात अग्रणी योगदान दिले आहे, असे मोदी म्हणाले. आज संयुक्त राष्ट्रसंघ ज्या घोषणा किंवा कृती करत आहे त्या स्वीकारल्या जात आहेत. तथापि, संघर्ष रोखणे, विकास सुनिश्चित करणे, हवामान बदल, विषमता कमी करणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा उठवणे यासारख्या बाबींवर आणखी कार्य होणे बाकी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जगाला आजच्या वास्तवाचा विचार करणाऱया, सर्व घटकांना आवाज देणाऱया, समकालीन आव्हानांचा सामना करणाऱया आणि मानवी कल्याणावर लक्ष केंद्रीत करणाऱया सुधारणांची गरज आहे, असेही मत मोदींनी व्यक्त केले.









