कनिष्ठ कर्मचाऱयांमध्ये अप्रितीची भावना पसरवल्याचा आरोप
प्रतिनिधी / मुंबई
पोलिस उपायुक्तांसोबतचे फोनवरील बोलणे रेकॉर्ड करून समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसशिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलद प्रतिसाद पथकाच्या(क्युआरटी) पोलिस उपायुक्तांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेले पोलिस शिपाई सचिन अभिराम जैस्वाल हे पोलिस दलातील कनिष्ठ कर्मचाऱयांच्या अडचणींबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करतात. पोलिस कर्मचाऱयांचे व्हॉट्सऍप ग्रुप व इतर समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होतात.
याप्रकरणी तक्रारीनुसार क्युआरटीचे उपायुक्त वसंत जाधव यांना 12 सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास जैस्वालचा दूरध्वनी आला होता. त्यात विशेष सुरक्षा विभाग एस पी यू येथे निवड झालेल्या सहा पोलिस कमांडोंना कार्यमुक्त का केले नाही, असे विचारले. त्यावेळी जाधव यांनी त्याला तुम्ही क्युआरटीमध्ये कामाला आहेत का, अशी विचारणा केली. त्यावेळी जैस्वाल याने आपण नायगाव येथे कामाला असल्याचे सांगितले व पोलिस संघटनेच्यावतीने आपण याबाबत विचारणा करत असल्याचे जैस्वाल याने जाधव यांना सांगितले. त्यावेळी जाधव यांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार या कमांडोंना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. तुम्हाला याबाबत काही बोलायचे असल्यास कार्यालयात येऊन भेट घेण्यास जाधव यांनी सांगितले.
त्याच्या चार तासानंतर पोलिसांच्या एका व्हॉट्सऍप ग्रुपवर एका पोलिस शिपायाने एक ध्वनीफीत अपलोड केली. ती ध्वनीफीत दुसरे तिसरे काही नसून जाधव व जैस्वाल यांच्यातील संभाषण होते. पोलिस कर्मचारी व अधिकाऱयांमध्ये व परिणामी सरकारबाबत द्वेषाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सऍप ग्रुपवर अपलोड केल्याचे उपायुक्त जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे. अखेर याप्रकरणी पोलिस अधिनियम 1922 च्या कलम 3(अप्रितीची भावना चेतावणे) अंतर्गत जैस्वालविरोधात गुन्हा दाखल केला आहे..









