विविध भागात 10 ते 15 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, नागरिकांमध्ये नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पाणीपुरवठा नियोजनाची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. मात्र सध्या शहर आणि उपनगरांमधील पाणीपुरवठा नियोजनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, विविध भागात 10 ते 15 दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुरुस्तीची कामे वेळेवर होत नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.
24 तास पाणीपुरवठा योजनेसह शहराच्या विविध भागात 10 ते 15 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. ऐन दसरा सणात पाणी समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. उपनगरांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. पण या भागातील पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. 24 तास योजनेंतर्गत येणाऱया उपनगरांमधील नागरिक नळाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुरू करून दहा वर्षे उलटली पण या दहा वर्षांत अशा प्रकारे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नाही. मात्र यावेळी सर्वच भागात ही समस्या निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
शहराच्या अन्य भागात 3 ते 4 दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. सध्या राकसकोप जलाशय तुडुंब भरून वाहत आहे. जलाशयातील अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात आले आहे. पण शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही भागात 10 दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच कूपनलिका आणि पुनरूज्जीवन करण्यात आलेल्या विहिरींचे विद्युतपंप खराब झाले असून, दुरुस्ती करण्याकडे एलऍण्डटी कंपनीने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत आणखी भर पडली आहे. राकसकोप जलाशयाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. तर विविध ठिकाणी असलेल्या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा वापर दैनंदिन कामासाठी केला जातो. पण आता पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एल ऍण्ड टी कंपनीकडे जबाबदारी सोपाविल्यापासून शहरातील पाणीपुरवठा नियोजनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. 10 ते 15 दिवस पाणीपुरवठा बंद होण्याची वेळ कधीच आली नाही. पण 24 तास पाणीपुरवठा करण्याचे काम घेतलेल्या कंपनीला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास अपयश आले आहे. तर कंपनीतील अधिकाऱयांच्या दुर्लक्षपणाचा आणि बेजबाबदारपणाचा फटका नागरिकांना बसत असल्याची टीका होत आहे.
अधिकाऱयांचे दुर्लक्ष
कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. पण त्या ठिकाणी तक्रार केली असता कोणताच प्रतिसाद मिळत नाही. कूपनलिकांची दुरुस्ती, विहिरींच्या विद्युतपंपांच्या दुरूस्तीसाठी तक्रारी करूनही कोणतीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे काही भागातील कूपनलिका दोन महिन्यांपासून बंद आहेत. अधिकाऱयांकडे तक्रार करण्यासाठी विचारणा केली असता सर्वच अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीकडे नेमकी कुणाकडे तक्रार करायची असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
एलअँडटी कंपनीच्या अटी व नियमावलीमुळे दुरूस्तीची कामे करण्यास विलंब होत आहे. कोणत्याही प्रकारची गळती लागल्यास किंवा पंप नादुरूस्त झाल्यास पाणीपुरवठा मंडळाकडून तातडीने दखल घेण्यात येत होती. पण कंपनीकडून दुरुस्तीचे काम वेळेवर होत नसून गळती निवारणासाठी चार ते पाच दिवसांचा वेळ घेतला जात आहे. दुरुस्तीसाठी अधिकाऱयांची परवानगी, लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी वरि÷ अधिकाऱयांची परवानगी अशा अडचणींमुळे दुरुस्तीचे काम करण्यास विलंब लागत आहे. याचा फटका शहरवासियांना बसत असून चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे.
लोकांना आंदोलन करावे लागेल : रवी साळुंके

वडगाव वॉर्ड नं. 27 मध्ये तब्बल 9 दिवसांनी पाणी आले. रोज पहाटे 5 ते 9 या वेळेत पाणी येते. रविवारी 5 वा. पाणी आले परंतु 7 वाजताच ते गेले. आपण घुमटमाळ येथील पाणीपुरवठा मंडळाच्या कार्यालयात जाऊन पाहणी केली. परंतु लक्ष्मीटेकडीहून पाणी आले नाही असे सांगण्यात आले. ज्या एलऍण्डटीकडे पाणीपुरवठय़ाचे काम देण्यात आले आहे. त्या कंपनीच्या अधिकाऱयांचे फोन बंद होते. प्रत्येकाने जबाबदारी झटकली पण लोक नगरसेवक व व्हॉल्वमन यांना निष्कारण धारेवर धरतात हीच परिस्थिती कायम राहिल्यास लोकांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा नगरसेवक रवी साळुंके यांनी दिला आहे.









