कोरोनाप्रकरणी राहुल गांधींचा केंद्र सरकारला सल्ला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लॉकडाऊनला सातत्याने विरोध करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आता देशात संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 20 दिवसांपूर्वीच राहुल यांनी लॉकडाऊनला तुघलकी पाऊल ठरविले होते. तर राहुल यांनी आता लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे.
लॉकडाऊन हाच पर्याय आता शिल्लक आहे, कारण केंद्र सरकारकडे कुठलीच रणनीति नाही. विषाणूला रोखण्यास अन्य कोणताही मार्ग शिल्लक नसल्याचे स्पष्ट करू इच्छितो, असे राहुल यांनी बुधवारी ट्विट करत सांगितले आहे.
तर मागील वर्षी केंद्र सरकारने देशभरात संपूर्ण लॉकडाऊन लागू केले असता राहुल गांधी यांनी विरोध दर्शविला होता. लॉकडाऊन कोरोनाचा वेग कमी करू शकतो, त्याला संपवू शकत नसल्याचा युक्तिवाद राहुल यांनी तेव्हा केला होता.
तर काही दिवसांपूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील देशभरात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली आहे. आयएमएकडून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी त्वरित लॉकडाऊन करण्यात यावे, असे म्हटले गेले होते. या टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएमआर यासारख्या संस्थांचे आरोग्यतज्ञही सामील होते.
अमेरिकेतूनही लॉकडाऊनचा सल्ला
अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फॉसी यांनीही भारतात कठोर लॉकडाऊन लागू करण्याचा सल्ला दिला आहे. भारतात कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी काही आठवडय़ांचे कठोर लॉकडाऊन लागू करण्यात यावे. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास मदत मिळू शकेल, असे त्यांनी म्हटले होते.









