ऑनलाईन टीम / मुंबई :
कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान निर्मितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. यादव यांनी तयार केलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाने पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यादव यांनी धुळे विमानतळावर या भारतीय बनावटीच्या विमानाचे टेक ऑफ, लँडिंग, स्पीड ऑफ, टर्न यासारख्या चाचण्या यशस्वी पार पाडल्या. हे विमान नियमित वापरात आणण्यासाठी आणखी दोन चाचण्या कराव्या लागणार आहेत.
यादव यांनी 1998 साली ‘थर्स्ट एअरक्राप्ट’ ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी विमाननिर्मिती करण्यास सुरुवात केली. काल चाचणी घेण्यात आलेल्या विमानाच्या निर्मितीला 2009 मध्ये त्यांनी मुंबईतील चारकोप येथे आपल्या घराच्या गच्चीवर सुरुवात केली. हे 6 आसनी विमान आहे. 2011 मध्ये या विमानाच्या नोंदणीसाठी त्यांनी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडे अर्ज केला. मात्र, विमानाची नोंदणी अपुरीच राहिली. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तक्षेपानंतर 2019 या विमानांची नोंदणी झाली.
कॅप्टन यादव यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय हे विमान पूर्ण केले आहे. त्यासाठी त्यांनी आपले घरही गहाण ठेवले आहे. या विमानाच्या बनावटीसाठी 6 कोटींचा खर्च झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.









