राष्ट्रीय स्तरावर चर्चा : विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे आव्हान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या अध्यक्षपदी निवडीची शक्मयता आहे. शरद पवार हे काँग्रेसच्या ज्ये÷ नेत्या सोनिया गांधी यांची जागा घेऊ शकतात. त्यादृष्टीने आता महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’प्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे. शरद पवार ही निवड स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. काँग्रेस आणि संपुआचे नेतृत्व सोनिया गांधींनंतर कुणाकडे द्यावे यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. सोनिया गांधी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बिहार विधानसभा आणि हैदराबाद महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता संपुआचे नेतृत्त्व कोणी करावे, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्यात आले होते. मात्र संपुआच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी उत्सुकता दाखवत नसल्याने आता शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे.
‘महाविकास आघाडी’ची पुनरावृत्ती केंद्रात
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचे सरकार वर्षभर टिकले. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवला. त्यामुळे शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरि÷ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार यांच्या माध्यमातून विरोधी पक्षांची आघाडी अधिक बळकट करण्यासाठी ही राजकीय खेळी असणार आहे. भाजपला रोखण्यासाठी आणि सक्षम पर्याय देण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय होण्याची शक्मयता आहे.
शेतकरी आंदोलनानिमित्त विरोधी पक्ष एकवटणार?
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकत्रित आल्यास आंदोलनाचे बळ वाढू शकते. तसेच संपुआचा आवाजही बुलंद होऊ शकतो. नुकतीच विरोधी पक्षातील शरद पवार, राहुल गांधी, सीताराम येचुरी आणि डी. राजा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यात पंजाबमधील अकाली दलाचा समावेश नसला तरी शरद पवार यांच्या माध्यमातून त्यांना विरोधी आघाडीमध्ये ओढले जाऊ शकते.









