ऑनलाईन टीम / मुंबई :
संजय राऊतांसोबत शनिवारी झालेल्या भेटीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत आणि माझी भेट झाली. मात्र, या भेटीत शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. आम्हाला सत्तास्थापनेची कोणतीही घाई नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
शनिवारी मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये राऊत आणि फडणवीस यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली. या भेटीला राजकीय वळण देण्यात आले. भाजप-शिवसेना पुन्हा युती होणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते.
यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी म्हटले आहे की, राऊतांसोबतची चर्चा राजकीय नव्हती. आम्हाला सत्तास्थापनेची कोणतीही घाई नाही. संजय राऊत दैनिक सामनासाठी माझी मुलाखत घेणार आहेत. त्याची रूपरेषा ठरवण्यासाठी आम्ही भेटलो. माझी मुलाखत अनकटच असेल आणि माझाही कॅमेरा तिथे असेल, असे मी त्यांना सांगितले.









