प्रतिनिधी / काणकोण
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य खाते, पोलीस, अग्निशामक दल त्याचप्रमाणे अन्य प्रशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱयांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. नुकतेच जे चक्रीवादळ आले त्यावेळी काणकोणचा वीज विभाग त्याचप्रमाणे आपत्कालीन सेवेच्या अंतर्गत येणाऱया सर्वांनीच आघाडीवर राहून काम केले. त्याचवेळी या सर्व घटनांचे वार्तांकन करणाऱया पत्रकारांची येथील सामाजिक किंवा राजकीय यंत्रणांनी म्हणावी तेवढी दखल घेतली नाही. काणकोणचे पत्रकार हे सर्व कामे करताना फळाची अपेक्षा करत नाहीत, असे सांगून काणकोणचे प्रमुख वृत्तपत्र विक्रेते आणि संजय न्यूज न्यूकचे मालक संजय कोमरपंत यांनी काणकोणच्या पालिका इमारतीमध्ये असलेल्या काणकोण पत्रकार संघाच्या कक्षात येऊन पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित पैंगीणकर यांच्याकडे एन-95 मास्क आणि अन्य साहित्य सुपूर्द केले. यावेळी उपस्थित असलेले हरिश्चंद्र खोलकर, बबेश बोरकर, नारायण देसाई, धीरज काणकोणकर, बेर्नाद फर्नांडिस तसेच संतोष गावकर यांनी संजय न्यूज न्यूकच्या भावनेची कदर करून या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.









