जितेंद्र पाटील यांची मागणी : राजकीय आकसातून: केवळ बोरगावची चौकशी : चुकीच्या प्रकरणांचे श्रेय अध्यक्षांनीच घ्यावे
प्रतिनिधी/इस्लामपूर
बोरगाव येथे संजय गांधी निराधार योजनांच्या प्रकरणांना मंजूरी मिळाल्यानंतर त्याची पत्रे संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षांच्या हस्तेच वाटण्यात आली होती. यामध्ये त्यांनी श्रेय घेतले. आणि बोरगाव मधीलच २०० प्रकरणाची चौकशी लावण्यात आली असून ही प्रकरणे चुकीची असतील तर यातील चुकीच्या प्रकरणांचे श्रेय ही अध्यक्षांनीच घ्यावे. तसेच केवळ एकाच गावातील प्रकरणांची चौकशी न करता, संपूर्ण तालुक्यातील प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या समितीत काँग्रेसला २ सदस्यपदाची संधी दिली आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी फक्त वाळवा तालुक्यासाठी सुमारे १ कोटी रूपयांचा निधी येतो. काही दिवसापूर्वी बोरगावातील एका अपंग बांधवाचे प्रकरण दिले असताना ते अपात्र केले. मात्र त्याच दिवशी तलाठ्याने अपात्र केलेले एक प्रकरण दिले असताना ते स्कॅनिंग करून पात्र करत मंजूर करण्यात आले. मग हा भेदभाव कशासाठी करण्यात आला. त्यातूनच बोरगावमधील सुमारे२०० प्रकरणांची चौकशी तहसिलदारांच्याकडून केली जात आहे. यामध्ये कुणाचा राजकीय दबाव आहे का, असा सवाल त्यांनी केला.
पाटील म्हणाले, मागील ६ महिन्यापासून प्रशासनाने कोणतीही मंजूर यादी बैठकीपूर्वी संबंधीत सदस्यांना दिलेली नाही. बैठकीमध्ये लाभार्थी पात्र करताना उपस्थित कागदपत्रांच्या आधारे की कुणाच्या फोनवरील माहितीच्या आधारे ठरविले जातात याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला, तर त्या सदस्याशी आकसाने वागले जाते. याचाच भाग म्हणून कोणाचीही मागणी नसताना व कोणाचाही अर्ज नसताना फक्त बोरगांव मधीलच लाभार्थ्यांचीच चौकशी कशासाठी सुरु आहे. बैठक सुरु असताना कुणाचा तरी हस्तक्षेप होतो. त्यामुळे मध्ये अध्यक्ष व सदस्य यांच्याशी चर्चा न करता घाईगडबडीत काही प्रकरणे प्रशासनाने पात्र असताना अपात्र ठरवली, तर काही प्रकरणे अपात्र असताना पात्र ठरवण्यात आली. ही गंभीर बाब आहे. सर्वांना समान न्याय मिळावा. यामध्ये सरकारची फसवणूक होत आहे. प्रशासनाने चौकशीचा विषय थांबवावा, अन्यथा तालुक्यातील सुरवातीपासून सुरू झालेल्या प्रकरणांची चौकशी करत त्यावरही कडक कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. यावेळी डॉ.आर.आर.पाटील, राजेंद्र शिंदे, अर्जुन खरात, निलेश जाधव उपस्थित होते.








