उच्च न्यायालयाने दिला आदेश, सहदेव यादगुडे यांची नियुक्ती करण्याचीही सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बसवेश्वर को-ऑप. पेडिट सोसायटी संचालकपदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी संजय कवटगीमठ यांनी बनावट जात दाखल दिला होता. त्याबद्दल सहदेव यादगुडे यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर धारवाड येथील उच्च न्यायालयाकडे हा खटला सुरू होता. त्या ठिकाणी सहदेव यादगुडे यांचे म्हणणे योग्य असून संजय कवटगीमठ यांचे संचालकपद रद्द करावे, असा आदेश धारवाड खंडपीठाने दिला आहे.
संजय कवटगीमठ यांनी अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र दाखल केले होते. त्यानंतर त्यांनी ती निवडणूक लढविली होती. याबद्दल निवडणूक अधिकारी एम. एस. पत्तार यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. 2018 मध्ये ही निवडणूक झाली होती. तक्रार करून देखील त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले होते. चिकोडीच्या तहसीलदारांनीही आपण हे प्रमाणपत्र दिले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तरीदेखील निवडणूक अधिकाऱयांनी हे प्रमाणपत्र स्वीकारुन निवडणूक लढविण्यास मुभा दिली होती.
यामुळे सहदेव यादगुडे यांनी ऍड. शिवराज बळ्ळोळी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संजय कवटगीमठ यांचे संचालकपद रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चिकोडी पोलीस स्थानकात देखील या प्रकरणाची नोंद झाली आहे. पी. आय. कोरे यांनी पोलीस अधिक्षक नागरिक हक्क संचलनालय यांच्याकडेही आपली तक्रार दिली आहे. सहदेव यादगुडे यांची नियुक्ती करण्याचा आदेश देखील बजावण्यात आला आहे.









