प्रतिनिधी/ सातारा
एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असतानाच संचारबंदी सुरू असून त्यामुळे नागरिक घरातच बसून आहेत. शाहूपुरी परिसरात नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळत घरी असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा सुरू असून शाहूपुरीत पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शाहूपुरीतील नागरिकांना पाणीच न मिळाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कमी दाबाने व काही ठिकाणी पाणीच उपलब्ध होत नसल्याने संचारबंदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. काही नागरिक टँकरने पाणी आणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र टँकरचे भाव भडकल्याने तेही नागरिकांना परवडत नाही. याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱयांना ही बाब कानी घातली असता ते प्राधिकरण अधिकाऱयांशी बोलत आहेत. मात्र पदाधिकारी व प्राधिकरणाचे अधिकारी वेळकाढूपणाची उत्तरे देत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही.
दरम्यान, प्राधिकरणाचे अधिकारी जंगम यांना याबाबत विचारले असता त्यांनी विसावा केंद्रातून पाणी उपसा पुरेसा होत नाही त्यामुळे नागरिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत, असे सांगितले. तसेच नगरपालिका हद्दीत नागरिकांना पाणी पुरावे म्हणून काही नगरसेवक शाहुपूरीकडे असलेल्या टाक्यांना कमी पाणी सोडण्यास सांगत असल्याचा प्रकारही समोर आला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तातडीने लक्ष घालून संचारबंदीच्या काळात शाहूपुरीतील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
लोकप्रतिनिधी बनले शोपीस
शाहूपुरीतील नागरिकांना गेल्या दोन तीन दिवसांत पाणी मिळत नाही याबाबत नागरिक ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्याकडे तक्रारी करत आहेत. मात्र त्यांच्याकडून ठोस उपाययोजना होत नाहीत तर प्राधीकरणाचे अधिकारीही नागरिकांना बेजबाबदारपणाची उत्तरे देत असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे लोकप्रतिनिधी केवळ शोपीस राहिले असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते गंभीर नसल्याचा आरोपही नागरिकांमधून होत आहे.








