सरसंघचालकांचे विधान
वृत्तसंस्था/ धर्मशाळा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्र सरकारला नियंत्रित करत नसल्याचे उद्गार सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार चालविण्याचा खरा रिमोट कंट्रोल संघाकडे आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
प्रसारमाध्यमांमध्ये संघाला सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून सादर केले जाते, पण हे चुकीचे आहे. केवळ आमचे काही कार्यकर्ते सरकारचा हिस्सा आहेत असे सरसंघचालकांनी धर्मशाळा येथे माजी सैनिकांना संबोधित करताना म्हटले आहे. सरकारकडून आम्हाला काय मिळते असे लोक विचारतात, यावर आमच्याकडे जे काही आहे ते गमवावे देखील लागू शकते असे उत्तर देत असल्याचे भागवत म्हणाले.
राहुल गांधींना प्रत्युत्तर
हजारो वर्षांपासून सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे. काही शब्द आमच्या जीवनाला चिकटतात, त्यांना हटविले जाऊ शकत नाही. हिंदुस्थानपासून हिंदू शब्द उद्भवला. हिंदुत्व कुणाला जिंकण्याची भूमिका मांडत नाही. हिंदुत्व शब्दाच ावापर सर्वप्रथम गुरुनानक देव यांनी केला होता. हिंदुत्व जोडणारे असून कुणाला विभागत नाही. धर्माचा अर्थ धारणा असून तो समाजाला जोडतो असे सरसंघचालक म्हणाले.
विश्वगुरु होऊ शकतो
सरसंघचालकांनी यावेळी भारताच्या प्राचीन उपचारपद्धतींवरही विचार मांडले आहेत. आमचे पारंपरिक भारतीय उपचार म्हणजेच काढा यासारख्या गोष्टींचा वापर वाढवावा लागणार आहे. पूर्ण जग आता भारताच्या प्राचीन मॉडेलचे अनुकरण करू इच्छित आहे. आमचा देश महासत्ता झाला नाही तरी विश्वगुरू मात्र होऊ शकतो असे भागवत यांनी म्हटले आहे.
स्वतःच्या कमकुवतपणामुळे हार
विदेशी आक्रमकांसोबतच्या लढाईत भारतीय भूमीचा पराभव स्थानिक लोक एकजूट नसल्यानेच झाला. आम्ही कधी कुणाच्या शक्तीने नव्हे तर स्वतःच्या कमकुवतपणामुळे हरतो असे विधान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत म्हटले आहे. भागवत यांनी या कार्यक्रमादरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि अन्य 13 जणांच्या स्मरणार्थ एक मिनिटांचे मौन राखले. सरसंघचालक भागवत हे हिमाचल प्रदेशच्या पाच दिवसीय दौऱयावर असून ते तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांची भेट घेऊ शकतात.









