प्रतिनिधी/ बेळगाव
कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ सर्कलपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे दररोजच वाहतुकीची कोंडी होत आहे. सोमवारी तर अक्षरशः वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. कित्तूर चन्नम्मापासून किल्ला तलावापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक आणि दुचाकीस्वार अक्षरशः वैतागून गेले. स्मार्ट सिटी की स्मार्ट कोंडी असेच म्हणण्याची वेळ साऱयांवर आली आहे.
सोमवार हा नेहमीच गजबजलेला दिवस असतो. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी संपूर्ण जिह्यातूनच विविध संघटना आणि नागरिक येत असतात. या रस्त्यावर न्यायालयही आहे. आरटीओ व इतर कार्यालये आहेत. त्यामुळे नेहमीच वर्दळ असते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. दोन महिन्यांपासून काम सुरू आहे. चार महिन्यांच्या पूर्वीपासून रस्ता बंद करण्यात आला आहे.
एकेरी वाहतूक या रस्त्यावरून सुरू आहे. वास्तविक रात्रीच्या वेळीदेखील काम करून या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. मात्र, केवळ बेजबाबदारपणा यामुळेच सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिव्हिल हॉस्पिटलही या परिसरात असल्यामुळे या कोंडीत बऱयाच वेळा रुग्णवाहिका अडकून पडत आहेत. या रस्त्यावरून सर्वच अधिकारी ये-जा करतात. मात्र, या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याबाबत कोणीच गांभीर्य घेण्यास तयार नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
कित्तूर चन्नम्मापासून किल्ला तलावापर्यंत जाण्यास जवळपास 1 तास लागत होता. त्यामुळे वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. एकूणच या प्रकाराकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









