ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांचे निधन : 90 व्या वर्षी अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास
न्यू जर्सी, पुणे / प्रतिनिधी
शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या 90 व्या वषी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जसराज यांच्या कन्या दुर्गा यांनीच सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्यानंतर भारतीय संगीतातील एक स्वर्गीय सूर शांत झाल्याच्या श्रद्धांजलीपर प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच शास्त्रीय संगीतातला तारा निखळला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
पद्मविभूषण पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारत सरकारने 2000 मध्ये संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. ते मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबलावादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ पंडित मणिराम यांनीचच जसराज यांचा सांभाळ केला होता. लहान वयात गानतपस्या सुरू करून त्यांनी गाण्यावर प्रभूत्व मिळवले होते. 28 जानेवारी 1930 मध्ये जन्मलेल्या पंडित जसराज यांना संगीताचा मोठा वारसा लाभला होता. त्यांच्या चार पिढय़ा संगीत साधनेत होत्या.
भारतीय संगीत आणि पंडित जसराज हे जणू समीकरणच झाले होते. सुमधुर आवाजाची देणगी मिळालेले पंडित जसराज यांनी भारतीय संगीतासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले होते. हरियाणातील हिसार येथील जसराज यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या मुलीशी मधुरा शांताराम यांच्याशी विवाह केला होता. मुंबई येथे 1960 च्या सुमारास मधुरा आणि जसराज यांची ओळख झाली होती.
अनेक देशांमध्ये शिष्यगण
भारतासह अमेरिका, कॅनडा येथेही त्यांचे अनेक शिष्य आहेत. भारतात पंडित संजीव अभ्यंकर, कला रामनाथ यासारख्या अनेक शिष्यांना त्यांनी घडवले आहे. आपल्या गायनातून श्रोत्यांना ईश्वर अनुभूती देणारे, देश-विदेशातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे पंडितजी हे संगीत क्षेत्रातले मोठे नाव होते. पुणे येथील सवाई गंधर्व महोत्सवात ते दरवर्षी सहभागी होत असत. या महोत्सवात आतापर्यंत अनेक मैफिली गाजवल्या होत्या. त्यांचे गायन आणि वादन अनुभवण्यासाठी संगीतप्रेमी मोठय़ा संख्येने आवर्जून सवाई महोत्सवाला गर्दी करत असत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर खगोलीय संघाकडून गौरव
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संगीत क्षेत्रात चंचूप्रवेश करत जवळपास 80 वर्षे सेवा केली. आपल्या कारकिर्दीत केलेल्या सर्वोच्च कामगिरीबद्दल आतापर्यंत पद्मभूषण, पद्मविभूषणसह विविध पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने 11 नोव्हेंबर 2006 मध्ये ‘2006 व्हीपी 32’ या छोटय़ा ग्रहाला पंडित जसराज यांचे नाव देऊन जसराज यांचा गौरव केला होता. हा सन्मान मिळविणारे भारतीय संगीत क्षेत्रातील ते एकमेव संगीतकार ठरले आहेत.
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांची श्रद्धांजली
संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल वेगळे सांगायची गरज नाही. त्यांनी शास्त्रीय संगीतात स्वतःची शैली निर्माण केली. शिष्यांच्या दोन-तीन पिढय़ा त्यांनी घडविल्या. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये दरवषी ते गात असत. आमच्या कुटुंबाशीदेखील त्यांचे प्रेमाचे संबंध होते. 1998-99 च्या सुमारास या महोत्सवात त्यांचे गाणे होते. माझी आई वत्सलाबाई जोशी या त्यावेळी आजारी असल्याने येऊ शकल्या नव्हत्या, तर दुसऱया दिवशी सकाळीच पंडितजी आमच्या घरी आले, त्यांनी हार्मोनियम मागवून घेतली न आईसमोर गायला बसले. मनस्वी आणि प्रेमळ स्वभावाच्या पं. जसराजांचे माझे वडील भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याशी देखील प्रेमळ नाते होते. ‘बिरबल माय ब्रदर’ या चित्रपटात त्या दोघांनी जोडीने पार्श्वगायन देखील केले होते. पं जसराज यांना माझी विनम्र श्रद्धांजली.









