प्रतिनिधी/ मुंबई
बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदपैकी वाजिद खान यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांना आधीपासून मूत्रपिंडाचा विकार होता. काही दिवसांपूर्वी त्यांची मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. पण चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ते व्हेंटिलेटरवर होते. सोमवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर वर्सोवा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाजिद खान यांच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता आदित्य पांचोली, वरुण धवन यांनी वाजिद खान यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. प्रियंका चोप्रा, अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, सोनू निगम या कलाकारांनी वाजिद खान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. वाजिद खान यांच्या निधनाची बातमी सोनू निगम यांनी ट्विटरद्वारे दिली. सलमान खानचे चित्रपट आणि साजिद-वाजिद यांचे संगीत हे समीकरणच बऱयाच वर्षांपासून बनले होते. साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंची कारकिर्द 1998 साली सलमान खानच्याच ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटापासून झाली. त्यानंतर सलमानची प्रमुख भूमिका असलेल्या तेरे नाम, दबंग, मुझसे शादी करोगी, पार्टनर या चित्रपटांना साजिद-वाजिद यांचे संगीत लाभले. नुकतेच सलमानने ईदनिमित्त भाई भाई हे गाणे गायले होते. या गाण्यालाही त्यांनीच संगीत दिले होते. साजिद -वाजिद या जोडीने सारेगमप या रिऍलिटी शोच्या काही सीझन्सचे परिक्षणही केले होते. वाजिद, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करेन. तुझा आदर करेन आणि तुला खूप मिस करेन. तुझे संगीत कौशल्यही मी मिस करेन, अशा शब्दांत सलमानने आपल्या भावना व्यक्त केल्या.
हसतमुख म्हणून वाजिद खान यांची इंडस्ट्रीमध्ये ओळख होती. शंकर महादेव यांनी म्हटले की, वाजिद खान यांचे निधन झाले यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, वाजिद खान यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. नेहमी हसणारे कौशल्य आज हरपले आहे. वरुण धवनने वाजिद खान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना म्हटले की, वाजिद खान माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या खूप जवळचे होते. एक सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणून वाजिद खान यांची ओळख होती.









