प्रतिनिधी/ संकेश्वर :
गेल्या चार दिवसापासून उष्म्याने लाहीलाही होत असतानाच गुरुवारी दुपारी संकेश्वर शहरासह परिसराला वळीव पावसाने झोडपले. पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. बुधवारी सायंकाळी हवामानात बदल होऊन ढगांचा गडगडाट व विजांचा चमचमाट सुरु झाला होता. पण पावसाने हजेरीच लावली नाही. त्यामुळे हवामानात अधिकचा उष्मा निर्माण झाला होता.
गुरुवारी पुन्हा कडाक्याच्या उन्हाने थैमान घातल्याने वारेही गायब झाले होते. दुपारी अचानक ढग जमू लागले. गार वाऱयाला सुरुवात होऊन पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पावसाने हजेरी लावल्याने हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. तर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. आगामी खरीप पेरणीसाठी हा पाऊस पोषक ठरल्याची चर्चा शेतकऱयांतून पुढे आली आहे. या पावसाने संकेश्वर, नांगनूर, निडसोशी, अंकले, गोटूर, गावनाळ आदी भागात हजेरी लावली.









