11 पैकी तिघांच्याअहवालाची प्रतीक्षा:जिल्हा-तालुका प्रशासनाकडून सीलडाऊनची अंमलबजावणीकडक
प्रतिनिधी / संकेश्वर
संकेश्वर येथे कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या 11 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 8 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अन्य तिघा जणांचे अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान जिल्हा आणि तालुका प्रशासनाने सीलडाऊनची अंमलबजावणी कडक केली असल्याने नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून नियम मोडणाऱयांवर वॉच ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱयाची मदत घेण्यात येत आहे.
पहिल्या चाचणीत आठजणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तिघांचे अहवाल अद्यापही आलेले नाहीत. दरम्यान सदर तिघांच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. याबरोबरच अन्य 42 जणांवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे. याबरोबर पोलीस प्रशासनाने चौकाचौकात आणि शहरात येणाऱया मुख्य मार्गावर बंदोबस्त कडक करताना अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनांना प्रवेश बंद ठेवला आहे. याबरोबरच नगर परिषद आणि आरोग्य खात्याच्यावतीने खबरदारी घेताना सर्वांना दक्ष राहण्याच्या सूचना कर्मचारी आणि अधिकाऱयांना करण्यात आल्या आहेत.
उपासमारीची वेळ
तब्बल 30 दिवस लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली आहे. तर शहरात कोरोनाबाधित आढळल्याने सध्या कडक सीलडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना सीलडाऊनमुळे अधिकच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रोजगार नाही, पैसा नाही यामुळे हातावरील पोट असणाऱया नागरिकांनावर उपासमारीची वेळ आली आहे. काही दानशूर व्यक्तींकडून मदत केली जात आहे. मात्र अद्यापही मदतीची गरज व्यक्त होत आहे. शासनाकडून झोपडपट्टी परिसरात दूध व भाजी पुरवठा सुरू आहे. याबरोबरच रेशन मिळत असल्याने समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
ड्रोन कॅमेऱयाचा राहणार ‘वॉच’
गेल्या दोन दिवसापासून पोलीस प्रशासन व नगरपरिषदेने शहराच्या सर्व भागातील हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱयाची नजर ठेवली आहे. यातून नियम मोडणाऱयांवर नजर ठेवून कारवाई करण्यास मदत होणार आहे. गेल्या दोन दिवसात शहरात छुप्यापद्धतीने आलेल्या दोघांना पोलीस व आरोग्य खात्याने ताब्यात घेऊन त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. त्यांची तपासणी करण्यात येत आहे.