‘परप्रांतीयांनो चले जाव’च्या घोषणा : नगरपरिषद मुख्याधिकाऱयांना दिले निवेदन
प्रतिनिधी/ संकेश्वर
संकेश्वरात परप्रांतीयांमुळे स्थानिकांचे जगणे मुस्कील झाले आहे. व्यापारी शिस्तीचा बट्टय़ाबोळ उडत आहे. तेंव्हा शहरासह पंचक्रोशीतून परप्रांतीयांना हटवावे, यासाठी सोमवारी शहरातील विविध संघटनानी दिलेल्या बंदच्या हाकेला सर्वच स्तरातून आपापले सर्व व्यवहार बंद ठेवून पाठिंबा देण्यात आला. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता.
सोमवारी सकाळी 10 वाजता विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदैवत श्री शंकरलिंग देवस्थानाला अभिषेक घालून दर्शन घेतले. यानंतर राणी चन्नम्मा सर्कल समोर चलेजाव… परप्रांतीय चलेजाव… अशा घोषणा देण्यात आल्या. येथून मोर्चा काढून नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलकांनी कूच केली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी जगदीश ईटी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाचा स्वीकार करून मुख्याधिकारी ईटी यांनी आपली मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय नष्टी, माजी नगराध्यक्ष अमर नलवडे, ऍड विक्रम कर्णिंग, नगरसेवक जयप्रकाश करजगी, शंकरराव हेगडे, प्रमोद होसमनी, दिलीप होसमनी यांची भाषणे झाली. या आंदोलनात चहा टपरीवाले, घाऊक व किरकोळ किराणा मालाचे व्यापारी, पानपट्टी, स्टेशनरी, भाजी विक्रेते यासह सर्वच स्तरातील व्यापाऱयांनी सहभाग घेतला होता.
दुय्यम दर्जाच्या साहित्याची विक्री
परप्रांतीय व्यापाऱयांकडून दुय्यम दर्जाच्या साहित्याची कमी दरात विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱयाकडे असणाऱया दर्जेदार मालाला महत्त्व मिळत नाही. यामुळे व्यापार, उद्योग धंद्याची शिस्त बिघडली आहे. अशीच परिस्थिती मुडलगी, गोकाक, घटप्रभा आदी भागातही पहावयास मिळत आहे. तेंव्हा कोणत्याही परिस्थितीत परप्रांतीयांना हाकलून द्यावे, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
घटप्रभा, मल्लापूर पी. जी. येथे आंदोलन
परप्रांतीय हटाव अशी मागणी करत पुकारण्यात आलेल्या घटप्रभा, मल्लापूर पी. जी. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरातील औषधे, हॉटेल, बार वगळता किराणा, स्टेशनरी, स्वीटमार्ट, इलेक्ट्रिकल, पानशॉप, सराफ व्यावसायिक, भांडी, बेकरी आदी सर्व दुकाने बंद असल्याचे दिसून आले. यावेळी व्यापाऱयांनी नगरपंचायत, स्टेशन रोड, गांधी चौक, बाजारपेठ आदी मार्गावरुन मोर्चा काढत मृत्यूंजल सर्कल येथे आंदोलन केले. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन अरभावीचे उपतहसीलदार एल. एच. भोई, घटप्रभा येथील पोलीस उपनिरीक्षक हलप्पा बालदंडी यांना देण्यात आले.









