प्रभुरामचंद्राचा सेवक, त्यांच्या आदेशाला आज्ञाप्रमाण मानत दास्यभक्तीकरता सदैव तत्पर, रामायणातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्त्व म्हणजे रामभक्त हनुमान होय. संकटमोचन, बलोपासनेसह बुद्धिची देवता म्हणूनही ज्याकडे पाहिले जाते अशा महाबली हनुमानाची आज जयंती. दरवर्षी मोठय़ा उत्साहाने भारतभर हनुमानाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.
हनुमान जयंती उत्सव हा हिंदूंचा महत्वाचा सण आहे. हनुमान हे भगवान श्रीराम यांचे उदार भक्त. श्रीराम यांच्याप्रति समर्पणासाठी हनुमान मानले जातात. याशिवाय शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते.
चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंती
चैत्र महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिनी हनुमानाचा जन्म झाला. हनुमान अवतार हा भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार मानला जातो. याशिवाय बजरंगबली, पवनसुत, पवनकुमार, महावीर, संकटमोचन, मारुती, रुद्र आणि इतर अनेक नावांनी भगवान हनुमानाची नावे आहेत.
विविध राज्यात वेगवेगळय़ा दिनी हनुमान जयंती
हनुमान जयंती उत्सवाला भारतात विशेष महत्त्व आहे. समाजातील विविध घटक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. विविध राज्यात वेगवेगळय़ा महिन्यात किंवा दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. गोवा व महाराष्ट्रात चैत्रपौर्णिमेला, ओडिआ दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी, कर्नाटक, आंध्रप्रदेश तेलंगणात हा दिवस वैशाख महिन्यात साजरा केला जातो. तामिळनाडू, केरळमध्ये हनुमान जयंती मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते.
सर्व मंदिरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण
गोव्यात हनुमान जयंतीदिनी संपूर्ण हनुमान मंदिरे गजबजलेली असतात. विविध भागात हनुमान जयंती मोठय़ा उत्साहाने थाटामाटात साजरी केली जाते. मंदिरांना आकर्षक पद्धतीने सजविले जाते. हनुमानाला शेंदूर, राई, अशाप्रकारची फुले-फळे वाहिली जातात. काही मंदिरात हनुमान चालीसाही म्हटली जाते. धार्मिक विधीनंतर प्रसाद वाटप केला जातो. संपूर्ण दिवस आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो.
मारुतीगड, विठ्ठलापूर, हनुमानजयंती उत्सवासाठी प्रसिद्ध
रूईच्या पानापासून तयार करण्यात आलेला हार हनुमानाला यादिवशी अर्पण करण्यात येतो. मळा-पणजी येथील मारुतीगड मंदिर, डिचोली येथील विठ्ठलापूर आणि काकोडा केपे येथील मंदिर हनुमान जयंती उत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणी यादिवशी वीरभद्र हा लोकप्रकारही सादर केला जातो. योद्धाची वेषभूषा करून आणि दोन्ही हातात तलवार पकडून वाद्यांच्या तालावर नृत्य सादर केले जाते. हे नृत्य यादिवशी एक विशेष आकर्षण ठरते.