वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर याला झालेल्या खांद्याच्या दुखापतीवर 8 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या दुखापतीमुळे अय्यरला आयपीएल क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागत आहे. दिल्ली डेअरडेविल्सच्या कर्णधारपदी आता अय्यरच्या जागी ऋषभ पंतची नियुक्ती करण्यात आली आहे. 26 वर्षीय अय्यरला पुणे येथे 23 मार्च रोजी झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळताना ही दुखापत झाली होती. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने मारलेला फटका अडविण्यासाठी अय्यरने झेप घेतली असताना त्याला ही दुखापत झाली. 8 एप्रिल रोजी अय्यरच्या या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आता अय्यरला किमान 4 महिने क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागेल. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी अय्यरने यापूर्वी लँकेशायर क्लबशी करार केला होता. पण या दुखापतीमुळे इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धाही त्याला हुकणार आहे. या दुखापतीतून लवकरच आपण पूर्ण तंदुरुस्त होऊन भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे अय्यरने सांगितले









